अनिश पाटील, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : कमी किमतीच्या रसायनाच्या नावाखाली प्रतिबंधित कीटकनाशकांची चीनमधून तस्करी करणाऱ्या टोळीतील एका आरोपी व्यवसायिकाला अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) यश आले. गेल्या काही वर्षांमध्ये या आरोपींनी  ३०० मेट्रिक टन कीटकनाशकांची तस्करी केल्याचे तपासात उघड झाले असून त्याची किंमत ३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. आरोपींनी १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा केंद्र सरकारचा महसूल बुडवला आहे. याप्रकरणी सुरत, न्हावा-शेवा आणि मध्य प्रदेशात डीआरआयने शोध मोहीम राबवली. तस्करी प्रकरणातील संपूर्ण व्यवहार हवालामार्फत करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तस्करी करणारी टोळी अन्य रसायनाच्या नावाखाली किंमत कमी जाहीर करून कीटकनाशकांची आयात करीत होती. चीनमधील मे. यिंग टॅट इन्वेस्टमेंट ग्रुप लि. यांच्याकडून त्याचा पुरवठा करण्यात येत होता. न्हावा-शेवा बंदरात २३ डिसेंबर रोजी ‘विनाईल एसेटेट इथेलिन कोपोलायमर’ऐवजी प्रतिबंधित कीटकनाशक असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आरोपी प्रवीण पाटीदार याच्या मध्य प्रदेशातील रतलाम येथील नरिमन सोसायटीतील घर व व्योम फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रोकेमिकल प्रा.लि.,  वेदांत अ‍ॅग्रोटेक व वैष्णवी फिनकेम यांच्या कार्यालयात तसेच वैष्णवी फिनकेमच्या कारखान्याच्या परिसरात शोध मोहीम राबवली.

पाटीदार यांच्यासह राजेश श्यामजीभाई वसोया व सुरेभाई वसोया हे गुजरातमधील सुरत व मध्य प्रदेशातून कीटकनाशकांची तस्करी करीत असल्याचे या वेळी उघड झाले. आरोपींनी ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कीटकनाशके कमी भाव दाखवून आयात केल्यामुळे आतापर्यंत सरकारचा १०० कोटी रुपये महसूल बुडवल्याचा अंदाज असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

आरोपींनी केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडून आवश्यक विविध परवानग्याही घेतल्या नसल्याचा संशय आहे. याबाबत डीआरआय अधिक तपास करीत आहे. याप्रकरणी पाटीदारला अटक करण्यात आली असून सूरत येथून दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

महसूल बुडवला..

केंद्रीय कीटकनाशक मंडळाच्या यादीत ‘नॅनो केके’चा समावेश नाही. त्याची किंमत प्रतिकिलो ५४ अमेरिकन डॉलर्स आहे. तसेच कोराजेन व इमामॅक्टीन बेन्झोअ‍ॅटचा दर प्रतिकिलो ७५अमेरिकन डॉलर्स आहे. तर विनाईल एसेटेट इथेलिन कोपोलायमरचा दर प्रतिकिलो दोन अमेरिकन डॉलर्स आहे. आरोपी विनाईल एसेटेट इथेलिन कोपोलायमर या कीटकनाशकाच्या नावाने नॅनो केके, कोराजेन व इमामॅक्टीन बेन्झोअ‍ॅट याची बेकायदेशिरीत्या आयात करून सरकारचा महसूल बुडवत होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 300 crore pesticide smuggling connection in madhya pradesh zws
Show comments