परदेशात ‘हॉलिडे टूर’च्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या मालाडच्या ‘मूव्ह हॉलिडेज’ कंपनीविरोधात तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढत असून आतापर्यत ३३३ जणांच्या तक्रारी आल्याचे पोलिसांनी सांगितले. या सगळ्यांना मिळून सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घालून कंपनीचे पदाधिकारी फरार झाले आहेत.
मालाड पश्चिमेच्या केम्प प्लाझा येथे मूव्ह हॉलिडे नावाने हे ऑफिस उघडले होते. थायलंड, मलेशिया, बँकॉक आदी देशांत सहली आयोजित करण्यासाठी त्यांनी जाहिराती दिल्या होत्या. लोकांनी या सहलींसाठी त्यांच्याकडे पैसे भरले होते. मात्र १ नोव्हेंबर रोजी कंपनीचे मालक करण व्यास, त्याची पत्नी अक्षता व्यास आणि विरेंद्रसिंग हे पैसे घेऊन फरार झाले होते. याप्रकरणी एक फिर्यादी अमरजित सिंग चढ्ढा यांनी आपली फसवणूकझाल्याचे लक्षात आल्यावर बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. आतापर्यत ३३३ जणांना या कंपनीने गंडा घातल्याचे समोर आले असून त्यांची १ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फसवणूक झालेल्या लोकांची संख्या आणि रक्कम आणखी वाढण्याची शक्यता बांगूर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ बागूल यांनी वर्तविली. या त्रिकुटाला पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Story img Loader