मुंबई : बोरिवली पूर्वे येथील मुंबई महानगरपालिकेच्या कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रात गेल्या सहा वर्षांमध्ये तब्बल ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यात आले. यामुळे अनेक बालकांचे आयुष्य सुकर झाले आहे. बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्र (बीएमटी) सुरू झाल्यापासून दरवर्षी केंद्रातील शस्त्रक्रियांच्या संख्येत वाढ होत आहे.
मुंबई महानगरपालिकेने थॅलेसिमियाग्रस्त, रक्तदोषाने आणि कर्करोगाने ग्रस्त बालकांना सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगता यावे, या उद्देशाने २०१७ साली बोरिवली येथे उपचार केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामध्ये जून २०१८ पासून बोनमॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. या केंद्रात जून २०१८ पासून २६ जुलै २०२३ पर्यंत तब्बल ३०० बोनमॅरो प्रत्योरोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०१८ मध्ये अवघे १३ प्रत्यारोपण करण्यात आले तर २०२२ मध्ये ही संख्या ७२ वर गेली. २०२३ मध्ये जुलैपर्यंत ४० रुग्णांचे प्रत्यारोपण करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांना मुंबई महापालिकेने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रूग्णालयात २५ ते ४० लाख रूपये खर्च येतो. परंतु, महानगरपालिकेच्या बीएमटी उपचार केंद्रात ही सुविधा निःशुल्क आहे.
हेही वाचा >>> मुंबई: यंदा महिला सबलीकरणासाठी थर; शिवसागर गोविंदा पथकाचा संकल्प
बोनमॅरो प्रत्यारोपण म्हणजे काय?
थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये दुषित लाल पेशी असल्यामुळे त्यांच्या शरीरात योग्य त्या प्रमाणात रक्त तयार होत नाही. त्यामुळे त्यांना नियमितपणे अनुरुप रक्तदात्याचे रक्त घेऊन लाल पेशी द्याव्या लागतात. तथापि, अशा रुग्णांच्या शरीरात बोनमॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्यास त्यांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणातील पेशींसह रक्त तयार करू लागते. त्यामुळे बोनमॅरोच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर या रुग्णांना रक्त देण्याची आवश्यकता भासत नाही. थॅलासेमियामध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण हे सामान्यपणे ८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये केल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात.
नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या केंद्राकडून सातत्याने आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. रूग्णांना अनुरूप बोनमॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आल्याने या बालकांच्या शरीरात आवश्यक त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार होऊ लागतात. – डॉ. ममता मंगलानी, संचालिका, बीएमटी केंद्र