मुंबई : सांताक्रुझमधील एस.व्ही. रोडवर मध्यभागी असलेले ३०० वर्ष जुने बाओबाबचे झाड ‘मुंबई मेट्रो २- ब’च्या सांताक्रुझ स्थानकात अडथळा बनले असून कोणतीही पूर्वकल्पना न देता हे झाड तोडण्यात आले. एक दुर्मिळ झाड काळाच्या पडद्याआड गेल्याबद्दल पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त करत रविवार, ५ मे रोजी शांततापूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
एस.व्ही. रोडवर मध्यभागी असलेले बाओबाबचे झाड ३०० वर्ष जुने होते. तसेच ४० फूट उंचीचे हे झाड परिसराच्या इतिहासाचा आणि रहिवाशांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होते. मात्र, ‘मुंबई मेट्रो २ – ब’च्या सांताक्रुझ स्थानकादरम्यान ते झाड अडथळा बनले होते. त्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता हे झाड मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने तोडल्याच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींनी आंदोलनचा निर्णय घेतला आहे. येत्या रविवार, ५ मे रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत एस.व्ही. रोड येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे.
बाओबाब हे प्रामुख्याने आफ्रिका खंड, तसेच ऑस्ट्रेलिया येथे आढळणारा वृक्ष आहे. झाडाची उंची ४० फुट होती. बाओबाब पानगळी वृक्षात मोडतो. याची फुले रात्री फुलतात, तसेच झाडाच्या खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या ठिकाणी देखील हे वृक्ष तग धरतात. झाडाचे आयुष्य हजार वर्षे इतके असते.
हेही वाचा – १० वर्षांच्या मुलावर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक, दुसरा मुलगा अल्पवयीन
३०० वर्षांहून अधिक काळ असलेले झाड अचानक तोडले जाते. कोणतीही पूर्वकल्पना न देता ते तोडले जाते. याबाबत कल्पना देण्यात आली असती तर या झाडाच्या पुर्नरोपणासाठी प्रयत्न केला असता. – अदिती जयकर, पर्यावरणप्रेमी