संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई: देशात तसेच महाराष्ट्रात मूत्रपिंड विकाराचे रुग्ण वेगाने वाढत असून यातील मोठ्या संख्येने रुग्णांना डायलिसीस सेवेची गरज भासत आहे. डायलिसीसवरील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आपल्या रुग्णालयात नव्याने ३१५ डायलिसीस मशीन घेण्याचा निर्णय घेतला असून याचा फायदा हजारो रुग्णांना मिळणार आहे.

देशाचा विचार करता मूत्रपिंड विकाराचे दरवर्षी सुमारे अडीच लाख रुग्ण वाढत असून सुमारे साडेतीन कोटी डायलील सायकलची गरज वर्षाकाठी भसत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकीकडे मूत्रपिंड विकारावर उपचार करणाऱ्या नेफ्रॉलॉजीस्टची संख्या अत्यंत कमी आहे तर दुसरीकडे मधुमेह व उच्चरक्तदाबांमुळे मूत्रपिंड विकार होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात आजघडीला २,६०० नेफ्रॉलॉजीस्ट आहेत तर जवळपास १५ हजार डायलिसीस केंद्रांची कमतरता भासत आहे. ज्या रुग्णांना डायलिसीस सेवेची गरज भासते अशा रुग्णांची संख्या वाढत असून ‘नॅशनल हेल्थ मिशन’ अंतर्गत ‘पंतप्रधाना राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रम’ राबविण्यास सुरुवात झाली आहे. यातून देशातील विविध राज्यात मोठ्या संख्येने डायलिसीस सेवा सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या रुग्णालयातील ५४ केंद्रांच्या माध्यमातून ३३६ डायलिसीस मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात डायलिसीस सेवा देण्यात येत आहे. सध्या आरोग्य विभागाच्या रुग्णालयात वर्षाकाठी ८४ हजार डायलिसीस सायकल रुग्णांना दिली जातात. तथापि वाढते रुग्ण लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अलीकडेच डायलिसीस सेवेचा आढवा घेऊन ३१५ नवीन डायलिसीस मशीन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ५० पेक्षा जास्त खाटा असलेल्या आरोग्य विभागाच्या ६३ रुग्णालयात खासगी-सार्वजनिक सहभागाच्या तत्त्वावर डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य विभागाच्या रुग्णालयात ६९१ डायलिसीस मशीन उपलब्ध होतील असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या रुग्णालयात सध्या दोन पाळ्यांमध्ये डायलिसीस सेवा दिली जाते ही सेवा तीन पाळ्यांमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आरोग्यामंत्र्यांनी सांगितले.

राज्यव्यापी मोहीम सुरू

एकीकडे डायलिसीस सेवा वाढवतानाच मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण शोधण्याची राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. यातून रुग्णांमध्ये व्यापक जनजागृती करून मधुमेह व उच्चरक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रबोधन करण्यात येईल असेही तानाजी सावंत म्हणाले. डायलिसीस सेवा ही अत्यंत खार्चिक असून गोरगरीब रुग्ण तर सोडाच पण मध्यमवर्गायांनाही ती परवडणारी नसल्याचे ज्येष्ठ नेफ्रॉलॉजीस्ट डॉ उमेश खन्ना यांनी सांगितले. मुंबईत महापालिका तसेच राज्यात आरोग्य विभागाने जास्तीतजास्त डायलिसीस सेंटर सुरु करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्यपणे किडनी विकाराचा जो रुग्ण डायलिसीवर आहे अशा रुग्णाला आठवड्यातून तीनवेळा डायलिसीस करावे लागते व एकवेळच्या डायलिसीससाठी १६०० ते २२०० रुपये खर्च येत असून याशिवाय औषधे व अन्य सामग्री यांचा खर्च वेगळा असल्याचे डॉ खन्ना यांनी सांगितले. याचा विचार करून मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये सरकारने तसेच डॉक्टरांच्या विविध संघटनांनी व्यापक जनजागृती करणे गरजेचे असल्याचेही डॉ. खन्ना म्हणाले. मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची वेगाने वाढत जाणारी संख्या लक्षात घेऊन राज्य व केंद्र पातळीव आरोग्य विभागाने व्यापक राष्ट्रीय धोरण तयार केले पाहिजे, असे हिंदुजा रुग्णालयातील ज्येष्ठ नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. ॲलन अल्मेडा यांनी सांगितले. मधुमेह व उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती होणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. अल्मेडा म्हणाले.

आरोग्य विभागाने मधुमेह तसेच रक्तदाब आणि कर्करुग्ण शोधमोहीम सुरु केली असून या योजनेला आगामी काळात गती देण्यात येईल, असे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे यासाठी आग्रही असून वाढते मूत्रपिंडविकाराचे रुग्ण लक्षात घेऊन ३१५ नवीन डायलिसीस मशीन घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. आरोग्यमंत्र्यांच्या सूत्रनेनुसार खाजगी रुग्णालयात ज्याप्रमाणे तीन पाळ्यांमध्ये रुग्णांना डायलिसीस सेवा दिली जाते त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या रुग्णालयात तीन पाळ्यात डायलिसीस सेवा देण्याबाबत आढावा घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही डॉ.अंबाडेकर म्हणाले.