रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यानंतर अर्धा-अर्धा तास रिक्षेसाठी थांबावे लागत असेल आणि तरीही रिक्षा फिरकत नसतील, तर आता काळजी करण्याचे कारण नाही. विविध रिक्षा संघटनांनी वेळोवेळी केलेली नवीन रिक्षा परवान्यांची मागणी अखेर मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या हद्दीत ३२ हजार आणि महाराष्ट्रभरात १५ हजार रिक्षांचे परवाने मंजूर केले आहेत. याबाबतचे आदेश परिवहन सचिवांना देण्यात आले असून लवकरच हे परवाने दिले जातील.  
महाराष्ट्रातील अनेक गावांचे, तालुक्याच्या शहरांचे नागरीकरण होण्याची प्रक्रिया गेल्या दशकापासून सुरू आहे. मात्र १९९७ पासून महाराष्ट्रात एकही नवीन रिक्षा परवाना देण्यात आला नाही. या मधल्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभरात एकूण ९४ हजारांच्या आसपास रिक्षा परवाने मृत झाले होते. त्यामुळे राज्यभरात रिक्षांची चणचण होती. यासंदर्भात रिक्षा संघटनांनी वारंवार मागणी करूनही कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र आता पृथ्वीराज चव्हाण यांनी हे मृत परवाने नव्याने मंजूर करण्याच्या सूचना परिवहन सचिवांना दिल्या आहेत.
या ९४ हजार मृत परवान्यांपैकी ६४ हजार परवाने हे मुंबई महानगर प्रदेशाच्या हद्दीतील आहेत. तर उर्वरित ३० हजार संपूर्ण महाराष्ट्रातील आहेत, असे परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशात ३२ हजार नवे रिक्षा परवाने देण्यात येणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात ही संख्या १५ हजार असेल. मृत परवाने असलेल्या लोकांना पुन्हा परवाने देताना सोडत पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
* हे रिक्षा परवाने दोन टप्प्यांत दिले जाणार असून पहिल्या टप्प्यात ५० टक्के परवाने मंजूर करण्यात येणार आहेत.
* मृत परवाने असलेल्या लोकांना पुन्हा परवाने देताना सोडत पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
* प्रत्येक जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालये याबाबतची कार्यवाही करणार. त्यासाठी व्यवस्थित कार्यक्रमाची आखणी करावी लागणार.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा