कांदिवली रेल्वेस्थानक आणि पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा आकुर्ली भुयारी मार्गाच्या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ३३ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच कांदिवली रेल्वे स्थानकाला पश्चिम द्रुतगती मार्गाशी जोडण्यासाठी आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरण आणि बांधकाम प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा(एमएमआरडीए) हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत ४१.९५ मी.लांबीचा आणि ३३.१० मी. रुंदीचा भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. पाच टप्प्यात याचे काम सुरू आहे.
पहिला टप्पा पूर्ण, दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर –
या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यांतर्गत डेक स्लॅबसह अन्य प्रकारची कामे करण्यात आली असून हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होईल अशी माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. तसेच यातील कुरार भुयारी मार्गाचे कामही वेगात सुरू असून हा मार्ग ऑगस्टअखेरीस पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर आकुर्ली भुयारी मार्ग येथील वाहतूक कोंडी दूर होणार असून प्रवासाचा वेळ आणि इंधन वाचणार असल्याचा दावाही त्यांनी केला.