मुंबई: गेल्या १० महिन्यांमध्ये मुंबई विद्रुप करणारे तब्बल ३३ हजार ७४२ राजकीय, व्यावसायिक आणि धार्मिक बॅनर्स, फलक आणि पोस्टर्स महानगरपालिकेने हटविले असून त्यात ११ हजार ०४१ राजकीय, तीन हजार १२१ व्यावसायिक, तर १९ हजार ५८० धार्मिक बॅनर्स, फलक आणि पोस्टर्सचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या ८०१ जणांविरूद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. तर ३७८ जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने मुंबईमध्ये राजकीय बॅनरबाजीला बंदी घातली आहे. असे असतानाही मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात येत आहे. मुंबईत ठिकठिकाणी नेते मंडळींना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन, सभा, कार्यक्रम, पक्षप्रवेश आदींबाबतचे राजकीय बॅनर्स झळकविण्यात येत आहेत. तसेच दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानिमित्त राजकीय नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करून परिसर विद्रुप करण्यात येत आहे. या प्रकारांना आळा घालण्यात मुंबई महानगरपालिका सपशेल अपयशी ठरली आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून सण-उत्सवांच्या काळात धार्मिक संस्थांकडूनही मोठ्या प्रमाणात बॅनर्स, फलक आणि पोस्टर्स झळकविण्यात येत आहेत.
मुंबईत अनधिकृतपणे झळकविण्यात येणारे बॅनर्स, फलक आणि पोस्टर्सवर महानगरपालिकेतर्फे अधूनमधून कारवाई करण्यात येते. महानगरपालिकेने जानेवारीपासून ऑक्टोबरपर्यंत १० महिन्यांमध्ये चार हजार ५०३ राजकीय, दोन हजार २८७ व्यावसायिक, तर १३ हजार ९८५ धार्मिक बॅनर्स हटविले. त्याचबरोबर दोन हजार ७१४ राजकीय, ७४६ व्यावसायिक आणि चार हजार ३३० धार्मिक फलक, तसेच १८८ राजकीय, ८८ व्यावसायिक आणि एक हजार २६५ धार्मिक पोस्टर हटविले. त्याचबरोबर ठिकठिकाणी उभारलेले ३९९ कटआऊटस्, दोन हजार ८८९ झेडे आणि ३४८ भित्तीपत्रके हटविण्यात आली. माहितीचा अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी वरील माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. महानगरपालिकेने अर्जाची दखल घेत यादव यांना २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीतील बॅनर्स, फलक, पोस्टर्सवरील कारवाईची माहिती दिली.
हेही वाचा… नववी मेट्रो गाडी अखेर मुंबईत दाखल
महानगरपालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उत्सवकाळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर फलकबाजी झाल्याचे निदर्शनास आले. सप्टेंबरमध्ये नऊ हजार ८०२, तर ऑक्टोबरमध्ये आठ हजार २२६ बॅनर्स, फलक, पोस्टर्स, विविध राजकीय पक्षांचे झेंडे हटविण्यात आले. महानगरपालिकेने मुंबई विद्रुप करणाऱ्या ८०१ जणांविरूद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर ३७८ जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका वेळोवेळी अनधिकृत बॅनर्स, फलक आदींवर कारवाई करीत असते. कारवाईदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर दोन पोलीस असणे बंधनकारक आहे. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी स्वयंस्फूर्तीने अनधिकृत बॅनर्स, फलक आदींवर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असे शरद यादव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.