मुंबई : म्हाडा गोरेगावमधील पहाडी परिसरातील गृहप्रकल्पात प्रथमच ३९ मजली निवासी इमारत बांधत आहे. या गृहप्रकल्पात व्यायामशाळा, जलतरण तलाव, विजेवरील वाहनांसाठी चार्जिंग स्थानक, मैदान आदी पंचतारांकीत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून ३९ मजली इमारतीमधील उच्च आणि मध्यम गटातील ३३२ घरांसाठी २०२५ ऐवजी २०२४ मध्येच सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे या घरांचा समावेश आता ऑगस्ट २०२४ मध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीत केला जाणार आहे.
मुंबई मंडळाच्या मालकीच्या पहाडी गोरेगाव येथील मोठ्या भूखंडाबाबत २५ वर्षांपासून असलेला वाद मिटल्यानंतर मंडळाने येथील अ आणि ब भूखंडावर सात हजार ५०० घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी चार हजार घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून यापैकी ३०१५ घरांच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. ३०१५ पैकी अत्यल्प गटातील १९४७ आणि अल्प गटातील ७३६ घरांसाठी २०२३ मध्ये सोडत काढण्यात आली होती. उच्च आणि मध्यम गटातील ३३२ घरांचे काम सध्या वेगात सुरू आहे. या घरांचे बांधकाम जून २०२५ मध्ये पूर्ण होण्याची, या घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घरांचा २०२५ च्या सोडतीत समावेश करण्यात येईल, असे यापूर्वी मुंबई मंडळाने जाहीर केले होते. मात्र आता या घरांचा २०२४ मध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीत समावेश करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. काम जून २०२४ मध्ये पूर्ण होणार असताना आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या घरांना सोडतीत प्राधान्य देण्याचे धोरण असतानाही मंडळाने निर्माणाधीन अशा या प्रकल्पातील घरांचा ऑगस्टच्या सोडतीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे उच्च आणि मध्यम गटासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
६० टक्के काम पूर्ण
ऑगस्टमध्ये २०२३ च्या सोडतीतील शिल्लक घरांसह अन्य नव्याने उपलब्ध घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. याच सोडतीत आता उच्च गटातील २२७ (९७९.५८ चौ फूट) आणि मध्यम गटातील १०५ (७९४.३१ चौ फूट) अशा एकूण ३३२ घरांचा समावेश असेल. ३९ मजली (पोडीयमसह) इमारतीच्या ३५ व्या मजल्यांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे एकूण ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
हेही वाचा – सीएसएमटी स्थानकात प्रवाशांचे हाल, अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे पुरुष महिलांची कुचंबणा
किंमत ८० लाख आणि सव्वा कोटी
गोरेगावमधील मध्यम गटातील घराची किंमत अंदाजे ८० लाख रुपये तर उच्च गटातील घराची किंमत अंदाजे सव्वा कोटी रुपये अशी असण्याची शक्यता आहे.