मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे ३५ दिवसांचा मोठा वाहतूक ब्लाॅक घेतला जाणार आहे. २७-२८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ५-६ ऑक्टोबरपर्यंत हा ब्लाॅक सुरू राहील. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांना काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोरेगाव – कांदिवली विभाग हा वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली दरम्यानच्या पाचव्या/सहाव्या मार्गाचा भाग आहे. वांद्रे टर्मिनस – बोरिवलीदरम्यान पाचवी मार्गिका आणि खार रोड – गोरेगावदरम्यान सहावी मार्गिका सुरू झाली आहे. तर आता गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सुमारे ४.५ किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे काम सुरू होणार आहे.

हेही वाचा – जखमी गोविंदांसाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज

३५ दिवसांच्या ब्लाॅकमध्ये गणेशोत्सवातील ७ ते १७ सप्टेंबरदरम्यानच्या कालावधीत प्रस्तावित कोणतेही काम केले जाणार नाही. त्यामुळे लोकल सेवा नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येईल. तर, ब्लाॅक कालावधीतच्या ५ व्या, १२ व्या, १६ व्या, २३ व्या आणि ३० व्या दिवशी पाच महत्त्वाचे १० तासांचे ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लाॅक कालावधीत सुमारे १०० ते १४० लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत, तर, ४० लोकल सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. या ३५ दिवसांच्या मोठ्या ब्लाॅक कालावधीत कमीत कमी लोकल फेऱ्या रद्द करणे अपेक्षित आहे. तसेच आठवड्यातील शेवटच्या दिवशी ५ ते ६ दिवसांच्या ब्लाॅकमध्ये सुमारे ८० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, ७० लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर कांदिवली – बोरिवली विभागात सहाव्या मार्गाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – व्यापार चिन्हाच्या उल्लंघनाचा वाद : पुण्यातील नेमसेक रेस्टॉरंटला बर्गर किंग नाव वापरण्यास तूर्त मज्जाव

भविष्यात प्रवाशांना मिळणारे फायदे

सध्या सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पामुळे खार रोड – गोरेगावदरम्यान सहावा रेल्वेमार्ग कांदिवलीपर्यंत वाढविण्यात येईल. डिसेंबरअखेरपर्यंत त्याचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचे नियोजन आहे. या कामामुळे लोकलचा वक्तशीरपणा सुधारेल. वांद्रे टर्मिनस धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी नवीन विस्तारित मार्गिका तयार होईल. अंधेरी – बोरिवली – विरारदरम्यानच्या प्रवाशांना हा मार्ग खूप फायदेशीर होईल. अतिरिक्त लोकल चालवण्यासाठी अतिरिक्त मार्गाचा उपयोग होईल. बोरिवली – खार रोड दरम्यानच्या सध्याच्या जलद मार्गावरील रेल्वे सेवाचा भार कमी होईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 35 days block on western railway work on the sixth route between goregaon kandivali has started mumbai print news ssb