मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली – बोरिवली स्थानकांदरम्यान पुलाची पायाभूत कामे करण्यासाठी मोठा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी १ पासून ते रविवारी रात्री १२ पर्यंत ३५ तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅक कालावधीत सुमारे १६३ लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच लांबपल्ल्याच्या काही रेल्वेगाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत पाचव्या मार्गावर धावणाऱ्या लोकल आणि रेल्वेगाड्या जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत लांबपल्ल्याच्या काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे. काही उपनगरीय लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत शनिवारी सुमारे ७३ लोकल, तर रविवारी सुमारे ९० लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

– शनिवारी गाडी क्रमांक १९४१८ अहमदाबाद – बोरिवली एक्स्प्रेस वसई रोडपर्यंत चालवण्यात येईल आणि वसई रोड ते बोरिवलीदरम्यान ही रेल्वे सेवा अंशतः रद्द करण्यात येईल.

– रविवारी २७ एप्रिल रोजीची गाडी क्रमांक १९४१७ बोरिवली-अहमदाबाद एक्स्प्रेस वसई रोडवरून चालवण्यात येईल. वसई रोड – बोरिवली दरम्यान ही रेल्वे सेवा अंशत: रद्द करण्यात येईल.

– शनिवारी आणि रविवारी गाडी क्रमांक १९४२५ बोरिवली – नंदुरबार एक्स्प्रेस भाईंदर येथून चालवण्यात येईल. भाईंदर – बोरिवली दरम्यान ही रेल्वे सेवा अंशतः रद्द करण्यात येईल.

– शनिवारी गाडी क्रमांक १९४२६ नंदुरबार – बोरिवली एक्स्प्रेस वसई रोडपर्यंत चालवण्यात येईल आणि वसई रोड – बोरिवली दरम्यान ही रेल्वे सेवा अंशतः रद्द करण्यात येईल.