गेले ३५ महिने सलग ते रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत. सामाजिक बांधीलकीचे भान बाळगून ‘नातं आपलं रक्ताचं’ हा उपक्रम चालू आहे. यापुढेही दर महिन्याला रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा त्यांचा निर्धार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या वरळीनाका मध्यवर्ती शाखाने हा उपक्रम सुरू केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्याला १७ नोव्हेंबर रोजी तीन वर्षे पूर्ण होतील. शिवसेनेच्या स्थापनेपासून रक्तदान शिबीर, रुग्णवाहिका आदी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत होते. पाच वर्षांपूर्वी ‘नातं आपलं रक्ताचं’ या उपक्रमातून शिवसेनेने एका दिवसात तब्बल २५ हजार ६५ रक्ताच्या पिशव्या जमा करून विश्वविक्रम केला होता. बाळासाहेबांच्या निधनाच्या पाश्र्वभूमीवर एका सामाजिक कामाचा यज्ञ कायमस्वरूपी पेटवत ठेवण्याचा निर्धार वरळी नाका शिवसेना शाखेने केला. शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून गेल्या ३५ महिन्यांत हजारो रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या आहेत. याशिवाय साडेपाच हजार रक्तदात्यांची सूची तयार करण्यात आली असून त्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोठय़ा प्रमाणात रक्त उपलब्ध करून देण्यात येते शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्ताचे नाते जपणारी एक आगळी आदरांजली आहे, असे अरविंद भोसले यांनी सांगितले.

Story img Loader