लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यात जूनमधील सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असली तरी मुंबईत मात्र पावसाची साधारण ३५ टक्के तूट आहे. मुंबईत ३० जूनपर्यंतच्या सरासरी पावसाच्या तुलनेत सांताक्रूझ येथे १९०.२ मिलिमीटर तर कुलाबा येथे ३५.३ मिलिमीटर पावसाची तूट नोंदली गेली आहे. दरम्यान, मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईमध्ये रविवारी दिवसभर पावसाची फारशी हजेरी नव्हती. अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र गेल्या आठवड्यात शहर आणि उपनगरांत पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे पावसाची तूट काहिशी भरून निघाली आहे. मात्र तरीही जूनमधील सरासरी यंदा पावसाने गाठलेली नाही. शहरात १ जून ते ३० जून सकाळी ८:३० वाजेपर्यंत ५०७ मिलिमीटर तर उपनगरांत ३४६.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईत जूनमध्ये कुलाबा येथे ५४२.३ मिलिमीटर, तर सांताक्रूझ येथे ५३७.१ मिलिमीटर सरासरी पाऊस अपेक्षित असतो. यानुसार उपनगरात ३५ टक्के पावसाची तूट आहे.

आणखी वाचा-जे जे रुग्णालयातील कर्मचारी ३ जुलैपासून बेमुदत संपावर

कुलाबा येथे २०१९ आणि २०२० मध्ये मासिक सरासरीपेक्षा पाऊस कमी होता. तसेच सर्वात मोठी तूट जूनमध्ये कुलाबा येथे २०१५ मध्ये नोंदली गेली होती. यावेळी महिन्याभरात केवळ ५५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर, सांताक्रूझ येथे २०१४ आणि २०२० मध्ये मासिक सरासरीपेक्षा कमी पाऊस होता.

दरम्यान, मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत वाऱ्यांची दिशा नैऋत्येकडून राहील तसेच वाऱ्यांचा ताशी वेग २० ते २३ किमी इतका राहील. याचबरोबर कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस राहील. दिवसभर ढगाळ वातावरण असेल.

आणखी वाचा-बनावट व्हिसा प्रकरण : आणखी एका नौदल अधिकाऱ्यासह चौघांना अटक

मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर</p>

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे,सातारा

मध्यम पावसाचा अंदाज

सांगली, सोलापूर,परभणी, बीड, लातूर

वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया , नागपूर, यवतमाळ

आणखी वाचा-पाच महिन्यात राज्यात १२९८ बाटल्या रक्त वाया; गतवर्षीच्या तुलनेत लाल पेशी खराब होण्याचे प्रमाण तुलनेने अधिक

पडझडीच्या घटना

मुंबई आणि शहरात शनिवार, रविवारी झालेल्या पावसाने अनेक पडझडीच्या घटना घडल्या. शहरात ५, पूर्व उपनगरात २ व पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ८ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. शिवाय शहर आणि दोन्ही उपनगरात एकूण २६ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात १ आणि शहरात २ अशा एकूण ५ ठिकाणी घरे, भिंती पडल्याच्या घटना घडल्या. कुलाबा येथील हवामान केंद्रावर शनिवारी सकाळी ७ ते रविवारी सकाळी ७ या कालावधीत १५.८ मिमी आणि सांताक्रुझ येथील केंद्रावर २५.२ मिमी पावसाची नोंद झाली.

महानगरपालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमान यंत्रावर शहर विभागात १७.६४ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच, पूर्व उपनगरात २८.३८ मिमी तर, पश्चिम उपनगरात २३.५४ मिमी पावसाची नोंद झाली.

Story img Loader