मुंबई : राज्यात मानसिक आजारांसह ताण-तणावाखाली वावरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मानसोपचार घेणाऱ्यांच्या संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मात्र मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी सरकारने राज्यात सुरू केलेल्या चारही मनोरुग्णालयांमध्ये जवळपास ३५ टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे भरली जात नसल्यामुळे तेथील आरोग्य सेवेवर परिणाम होत असून उपलब्ध कर्मचाऱ्यांनाही कामाचा ताण सहन करावा लागत आहे.
मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी राज्य सरकारने ठाणे, पुणे, नागपूर व रत्नागिरी येथे मनोरुग्णालये सुरू केली आहेत. या मनोरुग्णालयांमध्ये मानसिक आघात किंवा पूर्णत: मानसिक संतुलन बिघडलेल्या, मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना देशभरातून उपचारासाठी आणण्यात येते. बदलत्या जीवनशैलीमुळे मागील काही वर्षांपासून मानसिक आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी या चारही रुग्णालयांमध्ये रुग्णांना आराेग्यसेवा पुरविण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची कमतरता आहे.
चारही रुग्णालयांमध्ये विविध संवर्गातील मिळून जवळपास ३५ टक्के पदे रिक्त आहेत. चारही रुग्णालयांमध्ये एकूण २ हजार १९६ मंजूर पदांपैकी ४७७ पदे रिक्त आहेत. यामध्ये ‘गट अ’ संवर्गातील १०३ मंजूर पदांपैकी २४ पदे रिक्त आहेत. ‘गट ब’ संवर्गातील २४ पैकी १८ पदे, ‘गट क’ संवर्गातील ६५५ पैकी ९० पदे आणि ‘गट ड’ संवर्गातील १ हजार ४१४ पैकी ३४५ पदे रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होत असून, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.
पुणे व ठाण्यात सर्वाधिक पदे रिक्त
ठाणे, पुणे, नागपूर व रत्नागिरी या चार मनोरुग्णालयांपैकी पुणे व ठाण्यात सर्वाधिक पदे रिक्त आहेत. पुणे मनोरुग्णालयातील ९५४ मंजूर पदांपैकी १९१ पदे तर ठाणे मनोरुग्णालयात ७२३ मंजूर पदांपैकी १४२ पदे रिक्त आहेत. यामध्ये चतुर्थश्रेणी वर्गातील सर्वाधिक पदे रिक्त असून, पुणे मनोरुग्णालयात १३६ तर ठाणे मनोरुग्णालयात १०७ पदे रिक्त आहेत. यामध्ये पुरुष व स्त्री परिचर यांची पदे सर्वाधिक रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्याने येथील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पदे भरण्याची प्रक्रिया सुरू
राज्यातील ठाणे, पुणे, नागपूर व रत्नागिरी या चार मनोरुग्णालयांमधील ‘अ’, ‘ब’ व ‘क’ संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. टप्प्याटप्याने ही पदे भरली जातील. तसेच ‘वर्ग ड’च्या काही निकषांबाबत न्यायालयात प्रकरण असल्याने त्या भरतीला विलंब होत असल्याची माहिती मनोरुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.