मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसराला कांदा पुरवठा करणाऱ्या तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात सोमवारी कांद्याची आवक मागील आठवडय़ापेक्षा ४० ट्रकने वाढल्यानंतरही घाऊक बाजारात भाव चढेच राहिल्याने किरकोळ विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला. सकाळी आठ वाजता बाजारात ६२ रुपये किलोने कांदा विकला जात होता, पण त्याला खरेदीदारांनी हात न लावल्याने तीन तासाने हा भाव कमी करावा लागला.
संपूर्ण देशाला कांदा पुरवठा करणाऱ्या नाशिक, पुण्यात या वर्षी कांद्याचे कमी उत्पादन झाल्याने कांद्याचा भाव गगनाला भिडला आहे. चाळीत ठेवलेला कांदाही संपुष्टात आला आहे. त्यामुळे मागील आठवडय़ात किरकोळ बाजारात कांद्याने ७० रुपये किलोचा आकडा गाठला होता. कमी पुरवठय़ामुळे ही दरवाढ झाल्याचे स्पष्ट आहे. अशा पाश्र्वभूमीवर या आठवडय़ात एपीएमसी बाजारात सोमवारी १०८ ट्रक कांदा आला. मोसमामधील शेवटचा कांदा बाजारात पाठविला जात आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाव थोडा कमी होईल अशी आशा होती, पण ती फोल ठरली. यात संधीचे सोने करण्यासाठी काही कांदा व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात कांदा मागविल्याचे समजते. एका व्यापाऱ्याने तर सहा ट्रक कांदा मागविला. सकाळी आठ वाजता कांदा बाजारात कांद्याचा भाव ६२ रुपये प्रति किलो जाहीर करण्यात आला. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या किरकोळ विक्रेत्यांनी हात हलवत घरी जाणेच पसंत केले (घाऊक बाजारात इतक्या किमतीत कांदा घेतल्यास किरकोळ बाजारात तो ८० रुपये विकावा लागणार होता). त्यामुळे शेकडो टन कांदा बाजारात पडून राहिला. ग्राहकच  मिळाला नाही तर हा कांदा व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्यावाचून राहणार नव्हता. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी नाशिक-पुण्याशी संपर्क साधून एवढय़ा किमतीत कांद्याला उचल नसल्याचे सांगितले. तेथील व्यापाऱ्यांचेही त्यामुळे धाबे दणाणले. त्यांनी कमी किमतीत विकण्याची मुभा दिली आणि ११ वाजता कांद्याचा भाव दहा रुपयाने कमी झाला. त्यामुळे ८० रुपये गाठणारा कांदा ६५ रुपयांवर सध्या थांबला आहे. व्यापाऱ्यांच्या संगनमताने वाढविण्यात आलेली ही दरवाढ सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. सहा ट्रक कांदा मागवून स्वत:चे चांगभले करणाऱ्या व्यापाऱ्यालाही आठ-नऊ लाखांचा फटका बसल्याची चर्चा आहे.
कांद्याचे भाव वाढल्याने कांदा एकीकडे भाव खात असताना दुसरीकडे बटाटय़ाचे मात्र वाईट दिवस आले आहेत. १०-१२ रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या बटाटय़ाची आवक वाढली असून त्यातील तीन टन सडका बटाटा आज रस्त्यावर अक्षरक्ष: फेकून द्यावा लागला.

सरकार बदनाम!
कांद्याच्या भरमसाठ दरवाढीची चौकशी करून साठेबाज व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या दरवाढीमुळे सरकारही बदनाम होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये घसरण
गेले काही दिवस सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे भाव सोमवारी प्रतिक्विंटलला ३९५ रुपयांनी घसरले, असे आमच्या नाशिकच्या खास प्रतिनिधीने कळविले आहे. भावात घट झाल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Story img Loader