मुंबई : गावदेवी येथे बंदोबस्ताला तैनात पोलीसावर ३६ वर्षीय व्यक्तीने दगडाने हल्ला केल्याचा प्रकार गुरूवारी घडला. या हल्ल्यात पोलीस शिपाई शिवाजी उगले गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पण त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
तक्रारादार पोलीस शिपाई शिवाजी उगले गुरूवारी गावदेवी परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी मागून अनोळखी व्यक्ती आली. त्याच्याकडील गोणीमध्ये दगड भरले होते. आरोपीने गोणीमधील दगड उगले यांना मारण्यास सुरूवात केली. कबुतर खान्याजवळील सेल्फी पॉईन्ट येथे हा प्रकार घडला. त्यात उगले यांच्या डोक्याला, पायाला व कंबरेला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उगले यांच्यासोबत तैनात इतर पोलिसांनी आरोपी रणजीत सिंह सरताणी याला ताब्यात घेतले. याप्रकरणी उगले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर रणजीत सिंहला याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपी मुळचा गुजरात येथील असून त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे आढळले. उगले यांची प्रकृती ठीक असून आरोपी त्यांच्या परिचयाचा नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी गावदेवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.