मुंबई : नातेवाईकाच्या अंत्यविधीवरून परतत असताना मोटरगाडीने दिलेल्या धडकेत ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे मृत तरुणाच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर मोटरचालक तेथून पळून गेला. या अपघातात मृत तरुणाचा पुतण्याही जखमी झाला.गोरेगाव (पूर्व) येथे रमेश झोरे (३६) आणि त्यांचा पुतण्या नरेश (१८) गुरुवारी पहाटे कांदिवलीहून दुचाकीवरून घरी परतत होते. त्यांची दुचाकी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दिंडोशी उड्डाणपुलावर पोहोचली.
तेव्हा एका भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या स्कूटरला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. धडक देणारी मोटरगाडी घटनास्थळावर थांबली नाही. अपघातानंतर नरेश बेशुद्ध पडला. काही वेळाने त्याला शुद्ध आल्यानंतर त्याच्या आजूबाजूला पोलीस दिसले. त्याला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर नरेशने आपल्या काकांबद्दल विचारणा केली, झोरे गंभीर जखमी झाले होते आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. नरेशने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली, त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि जखमींना वैद्यकीय मदत न पुरवणे तसेच पोलिसांना माहिती न देण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी करीत आहेत. अपघात घडवणाऱ्या वाहनाचा व त्याच्या चालकाचा शोध घेत आहेत. दोघेही एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात नरेशलाही मार लागला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.