मुंबईः मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय पुतण्याची हत्या केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. आरोपी हबीबूर रेहमान खान (५६) याच्यासह त्याची पत्नी सना खान (३६) यांचे मृत व्यक्तीच्या कुटुंबासोबत शनिवारी भांडण झाले होते. त्यातून आरोपी हबीबूरने बांबूने हल्ला केला होता. हबीबूरविरोधात यापूर्वी पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय दोनवेळा त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वांद्रे पश्चिम येथील खोजा कब्रिस्तानजवळील परिसरात शनिवारी ही घटना घडली. मृत व्यक्ती कामरान फैजल रेहमान खान (३६) व्यवसायाने रिक्षा चालक होता. तो कुटुंबियांसोबत वांद्रे पश्चिम येथील गॅलेक्सी चित्रपतगृहाजवळील खान हाऊस येथे कुटुंबियांसोबत राहत होता. आरोपी हबीबूर व त्याची दुसरी पत्नी सना खानही त्याच परिसरात राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामरान, त्याची बहीण तोती व गुड्डी तसेच भाचा सादीक याच्यासोबत आरोपी हबीबूर व सना यांचे शनिवारी भांडण झाले. त्यानंतर संतापलेल्या हबीबूरने बांबू कामरानच्या डोक्यात मारला. त्यात तो खाली कोसळला. त्याला तातडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – देशभरातून हिमोफिलिया रुग्णांची उपचारासाठी महाराष्ट्रात धाव! हिमोफिलिया रुग्णांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालय आधारवड

याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असता हबीबूरने कामरानच्या डोक्यात बांबू मारल्याचे समजले. कामरानच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली, त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी हबीबूर व त्याची पत्नी सनाविरोधात हत्या, मारहाण, धमकावणे अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. सनानेही कामरानचा भाचा सादीकला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना

याप्रकरणी कामरानचा भाऊ इमरान खान(४३) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्तेच्या वादातून खान कुटुंबियांची नेहमी भांडणे होत होती. त्याबाबत याच वर्षी हबीबूरविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती. त्याच्याविरोधात यापूर्वीही पाच गुन्हे आहेत. त्यात मारहाण, धमकावणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 36 year old man murder over property dispute two arrested mumbai print news ssb