करोनाविरोधी लढ्यात डॉक्टरांनी कशाचीही पर्वा न करता दिवसरात्र रुग्णालयात राहून रुग्णांची सेवा केली. मात्र करोना लढ्याच्या या पहिल्या टप्प्यात शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालयातील तब्बल ३८ डॉक्टरांनी राजीनामे दिल्याची माहिती उघडकीस आली आहे.
हेही वाचा- मुंबईत गोवरचा आणखी एक बळी; रुग्णांची संख्या २५२
करोना काळामध्ये डॉक्टरांनी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यासाठी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करण्याचीही महत्त्वपूर्ण भूमिका डॉक्टरांनी बजावली. मात्र करोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे २३ मार्च ते १५ ऑगस्ट २०२० या कालावधीत लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालयातील ३८ डॉक्टरांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये २५ वरिष्ठ निवासी डॉक्टर, ९ निवासी डॉक्टर, तीन बंधपत्रित डॉक्टर, एक सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. हे डॉक्टर बालरोग विभाग, रोननिदानशास्त्र विभाग, नेत्र विभाग, क्ष किरण शास्त्र विभाग, वैद्यकीय विभाग, शल्यचिकित्सा विभाग, पोटासंबंधी विभाग अशा विविध विभागांमध्ये कार्यरत असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
हेही वाचा- महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची सक्ती
करोनामध्ये रुग्णांना डॉक्टरांची गरज असताना डॉक्टरांनी रुग्णालयातील रुग्णसेवेचा राजीनामा देणे हे अयोग्य आहे. करोनाच्या सुरूवातीच्या टप्प्यात ३८ डॉक्टरांनी राजीनामे देणे ही गंभीर बाब असून, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत माहिती अधिकारी कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी व्यक्त केले.