मुंबई :भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून, जवळपास १३ कोटी नागरिक हे पूर्व मधुमेहाच्या स्थितीमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३९ टक्के किशोरवयीन मुलींना मधुमेह होण्याचा धोका अधिक आहे. यामध्ये ग्रामीण भागातील मुलींंचे प्रमाण अधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्व-मधुमेह ही आराेग्यविषयक गंभीर अवस्था आहे. या टप्प्यात रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेली असते पण टाइप २ मधुमेहाचे निदान करण्याएवढी जास्त वाढलेली नसते. त्याअनुषंगाने राज्यातील १६ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलींमधील मधुमेहाची पातळी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १५२० मुली सहभागी झाल्या होत्या. या सहभागी किशोरवयीन मुलींपैकी २ टक्के मुलींना पूर्व-उच्चरक्तदाबाचा त्रास असल्याचे आणि १२.७ टक्के कमी एचडीएलने त्रस्त असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे या संशोधामध्ये ३९ टक्के किशोरवयीन मुली या पूर्व मधुमेहाच्या स्थितीमध्ये असल्याचे या सर्वेक्षणामध्ये दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्रातील भावी पीढीला मधुमेहाचा धोका असल्याचे दिसून येत असल्याचे मत डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी मांडले. लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे मुंबईमध्ये ‘विश्व स्वास्थम्’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘प्री-डायबेटिस ते डायबेटिस प्रवास’ या विषयावर दोन दिवसीय चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पाटील यांनी सर्वेक्षणातील निरिक्षणे मांडली.

हेही वाचा >>>कांदिवली ते दहिसर भागात उद्या पाणीपुरवठा कमी दाबाने

आयसीएमआर-आयएनडीएबी यांच्याद्वारे नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार, भारतातील सुमारे १५.४ टक्के शहरी लोकसंख्या आणि १५.२ टक्के ग्रामीण लोकसंख्या मधुमेहपूर्व स्थितीत आहे. त्याचप्रमाणे जगामध्ये २०२१ मध्ये २९८ दशलक्ष नागरिक हे पूर्व-मधुमेह स्थितीत होते. तर २०४५ मध्ये हे प्रमाण ४१४ दशलक्षापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जीवनशैलीत बदल करून तसेच योग्यवेळी तपासण्या करून मधुमेहाची स्थिती जाणून घेऊन आपण मधुमेहाचा धोका कायमस्वरुपात कमी करू शकतो. व्यक्तीचे आरोग्य सुधारून मधुमेहाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देऊ शकतो, असे लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक गोपाल शर्मा यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 39 percent of teenage girls in maharashtra are at risk of diabetes mumbai print news amy