मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने पालिकेच्या शाळांमध्ये विशेष स्वछता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने केवळ चार दिवसांत या मोहिमेच्या माध्यमातून १२२ शाळांमध्ये स्वच्छता करून तब्बल ६९ टन कचऱ्याचे संकलन केले. तसेच, सुमारे ३६ टन राडारोड्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तीन हजार मनुष्यबळाच्या साहाय्याने चार दिवसांत ३७ टन टाकाऊ वस्तूही गोळा करण्यात आल्या. शाळांमध्ये सुरू असलेली ही स्वच्छता मोहीम आणखी ११ दिवस राबविण्यात येणार आहे.

महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेची सातत्याने अंमलबजावणी, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेसंबंधित जनजागृती करण्याच्या हेतूने महानगरपालिका सातत्याने स्वच्छता मोहीम राबवत आहे.

या मोहिमेला व्यापक स्वरूप देत यापूर्वी पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, महानगरपालिकेची रुग्णालये, क्रीडांगणे आदीची स्वच्छता करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या विविध शाळांमध्ये ७ एप्रिलपासून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. एकूण १५ दिवस शनिवार, रविवार वगळता ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार ७ एप्रिल ते १० एप्रिलदरम्यान मुंबईतील महापालिकेच्या १२२ शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेतून एकूण ३६.६२ टन राडारोडा आणि ६९.९ टन कचरा गोळा करण्यात आला आहे. तसेच, ३७.८ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. शेकडो अद्ययावत यंत्रांच्या साहाय्याने ३ हजार ८३२ कामगार, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छता मोहिमेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ७ एप्रिल रोजी २९ शाळांमध्ये केलेल्या स्वच्छतेतून २०.१ टन कचरा गोळा करण्यात आला.

शाळांमध्ये दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत ही मोहीम राबविण्यात ये. या मोहिमेत सामाजिक संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, शालेय विद्यार्थी (इयत्ता ८ वी पुढील), स्वयंसहायता गट, गृहनिर्माण संस्था आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिक आदीं सहभागी होत आहेत.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने त्यापूर्वी मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, सोमय्या मैदान, अंधेरी क्रीडा संकुल, बोरिवलीतील कोरा केंद्र, मुलुंड क्रीडा संकुल आदी विविध क्रीडांगणांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती.