मुंबईः शिवडी येथे भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने दिलेल्या धडकेत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने जखमी व्यक्तीला कोणतीही मदत न करता तेथून पळ काढला. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसी टीव्हीच्या मदतीने वाहनाचा शोध घेत आहेत. शिवगुलाम श्रीराम कुर्मी (३९) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गवंडी काम करतो.

कुर्मी शिवडी येथील कोलडेपो परिसरातील गोदामात रहायचा. रविवारी तो गोदामातून शौचालयात गेला होता. तेथून परतत असताना त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. तो खाली कोसळला असता त्यांच्या दोन्ही पायावरून वाहन गेले. त्यामुळे त्याला उठता येत नव्हते. त्याने आरडाओरडा केला असता त्याचा मित्र हरकेश कुमारने त्याला पाहिले. त्याने तातडीने त्याचा भाऊ रामशंकर श्रीराम कुर्मीला शिवगुलामचा अपघात झाल्याचे सांगितले.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

माहिती मिळाल्यानंतर रामशंकर घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी शिवगुलाम रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला होता. त्याने पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली व मदत मागितली. त्यावेळी पोलीस घटनास्थळी मोबाइल व्हॅन घेऊन आले. त्यांनी जखमी शिवगुलामला व्हॅनमध्ये भरले व दक्षिण मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी शिवगुलामची तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

गंभीर जखमा

अपघातात शिवगुलामच्या उजव्या पायाचा चेंदामेंदा झाला होता. डाव्या पायाच्या गुडघ्याखाली गंभीर जखमा झाल्या होत्या. तो रक्तबंबाळ अवस्थेत सापडला. गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले आहे.

भावाच्या तक्रारीवरून गुन्हा

शिवगुलामच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्याचा मोठा भाऊ रामशंकर याच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय सहिता कलम १३४ (अ), १३४ (ब), १८४, १०६ (१), १२५ (ब), २८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस सीसी टीव्हीच्या मदतीने आरोपी चालकाचा शोध घेत आहेत. आरोपीने अपघातानंतर शिवकुमारला कोणतीही वैद्यकीय मदत न करता पलायन केले.

भावाचा जबाब

याप्रकरणी पोलिसांनी शिवगुलामचा भाऊ रामशंकरचा जबाब नोंदवला आहे. अपघातात शिवगुलाम गंभीर जखमी झाला. त्यावेळी तो शुद्धीवर होता. वाहनाने धडक दिल्यामुळे आपण खाली पडलो. वाहन आपल्या अंगावरून नेल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी शिवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.