लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘महारेरा’ने दलालांसाठी महारेराचे प्रशिक्षण आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यानुसार यासाठीची तिसरी परीक्षा २२ नोव्हेंबर रोजी होत आहे. राज्यभरातील १९ केंद्रावर होणाऱ्या परीक्षेला ५,५९२ जण बसणार आहेत.
रेरा कायद्यानुसार विकासक आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात दलाल (एजंट) म्हणून काम करणाऱ्यांना ‘महारेरा’ नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ही नोंदणी असेल तरच दलालांना घर खरेदी-विक्रीचे व्यवहार्य करता येतात. ‘महारेरा’ने दलालांना ही नोंदणी बंधनकारक केली असून आता दलालांना प्रशिक्षण आणि प्रशिक्षण प्रमाणपत्रही बंधनकारक करण्यात आले आहे. दलाल म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण, प्रशिक्षण नसल्याने कोणीही या क्षेत्रात येतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. घर खरेदी-विक्री व्यवहारात ग्राहकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. ही बाब लक्षात घेऊन ‘महारेरा’ने दलालांसाठी महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. दलालांना नोंदणीसाठी १ सप्टेंबरपासून हे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
आणखी वाचा-मुंबई : म्हाडा घरांच्या पुढील सोडतीत शंभर टक्के प्रतीक्षा यादी?
दलालांसाठीच्या प्रशिक्षणासाठी महारेराने विशेष अभ्यासक्रम तयार केला असून आयबीपीएच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. २० मे रोजी राज्यात पहिली परीक्षा पार पडली. दुसरी परिक्षा ६ ऑगस्ट रोजी झाली. या दोन परीक्षांमध्ये ३,२१७ उमेदवार उत्तीर्ण झाले असून राज्यभरातील सुमारे ४५ हजार दलालांची नोंदणीही झाली आहे. मात्र ४५ हजारांपैकी १३ हजार दलालांनी नूतनीकरण न केल्याने राज्यात प्रत्यक्षात ३२ हजार दलाल कार्यरत आहेत. आता २२ नोव्हेंबर रोजी तिसरी परीक्षा होत आहे. ही परीक्षा राज्यातील १९ केंद्रावर होणार असून परीक्षेस ५,५९२ जण बसणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील २,७३२, पुण्यातील २,१०४, नागपूरमधील ५९२, नाशिकमधील ७८, कोल्हापूरमधील २६, छत्रपती संभाजीनगरमधील २०, अहमदनगरमधील ८, अकोल्यातील ६, सोलापूरातील ५,अमरावती, नांदेड, सांगली आणि सातऱ्यातील प्रत्येकी ३, पंढरपुर आणि वर्धा येथील प्रत्येकी एक उमेदवार या परीक्षेला बसणार आहे.