बेहरामपाडय़ात पाच मजल्यांच्या ५०० झोपडय़ा; पालिकेच्या अहवालातून वास्तव उघड
धारावीमधील झोपडपट्टीशी स्पर्धा करू पाहात असलेल्या वांद्रे येथील बेहरामपाडय़ात पाच आणि त्यापेक्षा अधिक मजले असलेल्या सुमारे ५०० इमारती असल्याची धक्कादायक माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आली आहे. पोलिसांच्या मदतीने पालिका अधिकाऱ्यांनी पाच मजली इमले असलेल्या झोपडय़ांवर कारवाईचा बडगा उगारत पाच झोपडय़ा जमीनदोस्तही केल्या. मात्र वाढता विरोध लक्षात घेत पालिका अधिकाऱ्यांनी माघार घेतली. तूर्तास रमझानमुळे या कारवाईला ब्रेक लागला असून आयुक्तांच्या आदेशाची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा आहे.
राजकीय आशीर्वादामुळे वांद्रे येथील बेहरामपाडय़ात अस्ताव्यस्तपणे झोपडपट्टय़ांचा पसारा वाढला. त्यानंतर जागा कमी पडू लागल्याने झोपडपट्टी माफियांनी झोपडय़ांवर इमले चढविण्यास सुरुवात केली. या संदर्भात ‘लोकसत्ता-मुंबई’मध्ये ४ जून, २०१६ रोजी वृत्त प्रसिद्ध होताच पालिका आयुक्तांनी बेहरामपाडय़ातील झोपडय़ांबाबत अहवाल पाठविण्याचे आदेश ‘एच-पूर्व’ विभाग कार्यालयाला दिले. त्यानुसार ‘एच-पूर्व’ विभाग कार्यालयाने संपूर्ण बेहरामपाडय़ाची पाहणी करून अहवाल तयार केला असून तो पालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर करण्यात आला आहे. दाटीवाटीने वसलेल्या बेहरामपाडय़ात पाच मजले असलेल्या तब्बल ५०० झोपडय़ा असल्याचे आढळून आले आहे. कोणतीही परवानगी न घेताच झोपडय़ांवर इमले चढविण्यात आले असून या झोपडय़ा अत्यंत धोकादायक आहेत. निवासी वापराबरोबरच छोटे-मोठे अनेक व्यवसाय या झोपडय़ांमध्ये बेकायदेशीरपणे चालतात. त्यामुळे, एखाद्या झोपडीवरील इमले कोसळल्यास अथवा आग लागल्यास बेहरामपाडय़ात मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
पालिका आयुक्तांना अहवाल सादर केल्यानंतर ‘एच-पूर्व’ विभाग कार्यालयाने बेहरामपाडय़ात कारवाईचा धडाका लावला होता. गेल्या आठवडय़ात कडेकोट बंदोबस्तात या झोपडपट्टीतील पाच मजली पाच झोपडय़ा तोडण्यात आल्या. मात्र कारवाईदरम्यान झोपडपट्टीवासीयांकडून कडवा विरोध होऊ लागल्यामुळे पोलिसांच्या विनंतीवरून पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई थांबवली. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालिकेने रमझाननंतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेलगामपाडा!
राजकीय आशीर्वादामुळे वांद्रे येथील बेहरामपाडय़ात अस्ताव्यस्तपणे झोपडपट्टय़ांचा पसारा वाढला.
Written by प्रसाद रावकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-06-2016 at 02:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 5 storeys high huts in behrampada