वडाळाच्या भक्ती पार्क या उच्चभ्रू वसाहतीमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सोमवारी सकाळी आढळल्याने खळबळ माजली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्या चेहऱ्यावर प्लास्टिकच्या पिशव्या गुंडाळल्या असल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हे मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाले, असावेत, असा अंदाज आहे
भक्तीपार्कमधील ‘ओडीसी’ इमारतीच्या पाचव्या मजल्यावर डोन्टोस अँथोनी (४७) हे पत्नी एलिझाबेथ (४६) तसेच जेनस (१२) व विव्हियन (४) या दोन मुलांसह राहत होते. वरळी येथे राहणारा त्यांचा भाऊ अनिल अँथोनी मुलासह सोमवारी सकाळी त्यांच्या घरी आला होता. तेव्हा घरातील शयनगृहात चौघांचे मृतदेह त्यांना एका रांगेत पडलेले आढळले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्वाच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्या गुंडाळलेल्या होत्या. या पिशव्या कचराकुंडीत कचरा भरण्यासाठी वापरल्या जातात. त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना दोन रसायनांचे कॅन सापडले आहेत. या रसायनांचे प्राशन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे मृतदेह पडलेले असावेत.
घरातील वातानुकूलन यंत्रणा सुरू असल्यामुळे बाहेर दरुगधी पसरली नसावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज असला तरी इतर शक्यताही पडताळून पाहत आहोत, असे उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले. घरामध्ये कुठल्याही सामानाची उलथापालथ झालेली नव्हती तसेच काही ऐवजही चोरीला गेल्याचे दिसत नाही वा दार तोडून घरात प्रवेश केल्याच्या कुठल्याही खुणा घटनास्थळी आढळल्या नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
कुणाशीही न मिसळणारे कुटुंबीय!
अँथोनी कुटुंबीय ओडीसी इमारतीच्या सी विंगमधील नवीन नराळे यांच्या ५०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये गेल्या चार वर्षांपासून भाडय़ाने रहात होते. अँथोनी हे ऑडिटिंग आणि जाहिरात क्षेत्रातील कामे करीत होते. त्यांची पत्नी गृहिणी होती. मुलगा जेनेस माटुंग्याच्या डॉन बॉस्को शाळेत नववीत तर मुलगी व्हिवियन ज्युनियर केजीमध्ये शिकत होती. इमारतीत ते फार कुणामध्ये मिसळत नसत, अशी माहिती रहिवाशांनी दिली.
घरातील माशांची आणि झाडांची काळजी
वरळीत अँथोनी यांचे बंधू अनिल राहतात. त्यांनी शुक्रवारी फोन केला तेव्हा आम्ही काही दिवसांसाठी बाहेरगावी जात असून अधूनमधून फ्लॅटमध्ये येऊन फिश पाँडमधील माशांना खाद्य दे तसेच झाडांना पाणी घाल, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार अनिल सोमवारी सकाळी मुलगा ग्रेशस याच्यासोबत घरी आले होते. आपल्याकडील चावीने त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा दारात तीन दिवसांची वर्तमानपत्रे आढळली तसेच शयनगृहात अंगावर शहारे आणणारे दृश्य आढळले.
कर्ज की मालमत्तेचा वाद?
शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच यावर नेमका प्रकाश पडू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. आधी मुलांना मारून पती-पत्नीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. तोंडाला पिशव्या गुंडाळण्याचे कारण काय असावे, याचाही पोलीस तपास करत आहेत. ज्या फ्लॅटमध्ये अँथोनी रहात होते तो नराळे यांच्या मालकिचा होता. ते जरी भाडय़ाने राहत असले तरी या फ्लॅटवर त्यांनी हक्क सांगितल्याने वाद निर्माण झाला होता. त्याबाबत न्यायालयात खटला सुरु होता. शुक्रवारी त्याबाबत निकाल लागला तो अँथोनी यांच्या विरोधात. त्यामुळे त्यांनी नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलले असावे असा कयासही वर्तवला जात आहे. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. अँथोनी यांच्यावर भरपूर कर्ज असल्याची माहिती वडाळा ट्रक टर्मीनस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नागेश जाधव यांनी दिली.