नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४ हजार कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. ‘गुरू दा गद्दी’च्या निमित्ताने नांदेडचा जसा विकास करण्यात आला, त्याच धर्तीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांचा विकास करण्यात येणार असून त्याचाही आराखडा सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची लवकरच बैठक होणार असून त्यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पहिल्या टप्प्यात १५०० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
नाशिकमध्ये सन २०१५-१६ दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती गठित करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून पायाभूत सुविधांसाठी ४ हजार १७८ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. त्यामध्ये रस्ते, गोदावरी घाट, पर्यटन विकास, आपत्कालीन व्यवस्थापन, पोलिसांसाठी सोयी-सुविधा, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा आदी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नांदेड शहराच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहराचा विकास केला जाणार असून त्याचा आराखडा सरकारला सादर करण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी नाशिकसाठी १२०० तर त्र्यंबकेश्वरसाठी ३०० रुपये देण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच होणाऱ्या शिखर समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.

Story img Loader