४० मुलांच्या निवासी शिक्षणाची सोय
वह्य़ा, पाठय़पुस्तके, गणवेश, चप्पल, छत्री, दप्तर आणि आता टॅबही.. मुंबईतील महापालिका शाळेत शिकणारी मुले या शैक्षणिक वस्तूंनी समृद्ध झाली असली तरी डोक्यावर छप्परच नसलेल्या आणि मुंबईच्या रस्त्यांवर अत्यंत बकालपणे जगावे लागणाऱ्या मुलांकरिता शिक्षणाचा मार्ग कधीच प्रशस्त होत नाही. अशा मुलांची अडचण ओळखून ‘टच’ या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने बोरिवली ते विलेपार्ले परिसरांतील तब्बल ४० मुलांच्या शिक्षणाबरोबरच निवाऱ्याचीही सोय करीत त्यांना शिक्षणाचा राजमार्ग उपलब्ध करून दिला आहे.
घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक कुटुंबांतील मुलांना शिक्षण घेता येत नाही. त्यापैकी अनेकांना वाईट सवयी लागतात. मात्र ज्या मुलांची मनापासून शिकण्याची इच्छा आहे, अशा मुलांच्या भविष्याचा मार्ग दाखविण्यासाठी ‘टच’ (टर्निग अपॉच्र्युनिटी फॉर अपलिफ्टमेंट चाइल्ड हेल्प) ही सामाजिक संस्था ‘ब्रिज स्कूल प्रोजेक्ट’ या प्रकल्प चालवीत आहे. बोरिवली ते विलेपार्ले परिसरांतील रस्त्यांवर, पुलाखाली, रेल्वे रुळाजवळ राहणाऱ्या २२० मुलांना ‘टच’ने आपल्या पंखाखाली घेतले आहे. एका बसचे शाळेतील वर्गाप्रमाणे रूप पालटून त्यात व्हिडीओ गेम्स, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, जेवण अशी सोय करण्यात आली आहे. याशिवाय अनौपचारिक प्रकारचे शिक्षण या बसमध्ये दिले जाते, जेणेकरून मुलांना अभ्यासाची गोडी लागेल. ‘‘त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र त्यांचे भविष्य घडवायचे असेल तर औपचारिक शिक्षणाची गरज आहे. मुंबईत या मुलांच्या राहण्याचा ठिकाणा नसल्याने आम्ही मुंबईलगतच्या कसारा येथील विहीगावात त्यांच्याकरिता निवारा केंद्राची सोय केली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात आता ही मुले अभ्यासाचा श्रीगणेशा करणार आहेत,’’ असे टचच्या मनीषा चव्हाण यांनी सांगितले. या निवारा केंद्रात मुलांच्या राहण्याची सोय करण्याबरोबरच त्यांचा इतर सर्व खर्चही संस्थेच्या वतीने केला जाणार आहे.
काही मुलांच्या पालकांकडून शिकण्याची परवानगी मिळत नाही. अशा पालकांचे समुपदेशनही ही संस्था करते. सध्या ४० मुलांचे पालक मुलांना धाडण्याकरिता तयार झाले आहेत. विलेपार्ले येथे रस्त्यावर कंगवे विकणाऱ्या लक्ष्मी ठाकूर यांनी आपल्या गौरी (वय ९ वर्षे) आणि रेश्मा (वय १७ वर्षे) या दोन्ही मुलींना या निवारा केंद्रात दाखल करण्याचे ठरविले आहे. आपल्या मुलींना चांगले शिक्षण मिळून त्यांचे भविष्य घडावे इतकीच आपली इच्छा असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. त्यांची मुलगी रेश्मा हिला डॉक्टर बनायचे आहे. रेश्मा नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली आहे.
‘ब्रिज स्कूल प्रोजेक्ट’अंतर्गत बोरिवली ते विलेपार्लेदरम्यान आम्ही ‘स्कूल ऑन व्हील’ चालवितो. हा प्रकल्प सध्या पाल्र्यापर्यंत मर्यादित असला तरी भविष्यात तो पुढे नेण्याचे आमचे उद्दिष्ट असून काही दिवसांतच हे पूर्ण होईल. आम्ही मुलांच्या पालकांना भेटून त्यांचे समुपदेशन करुन मुलांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना निवारा केंद्रात पाठवावे यासाठी मन वळवीत आहोत.
– आर्दीप राठोड, प्रकल्प समन्वयक