फेब्रुवारीत मुदत संपणार असल्याने पालिकेची घाई
गरोदर, बाळंतीण महिला आणि रक्तक्षय झालेल्या मुलींना पुरविण्यात येणाऱ्या तब्बल ४० लाख लोहयुक्त गोळ्यांची मुदत येत्या फेब्रुवारीला संपणार असल्याने त्या तातडीने संपविण्याचे अजब आदेश मुंबई महापालिकेने आरोग्य केंद्रातील कर्मचारी व आरोग्य स्वयंसेविकांना दिले आहेत. परंतु, गोळ्यांचा एवढा मोठा साठा इतके दिवस पडून राहिल्याने पालिकेच्या भोंगळ कारभार उघड झाला आहे.
गरोदर, बाळंतीण महिला अथवा रक्तक्षयग्रस्त १० ते १८ वयोगटातील मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीन कमी होत असल्याने त्यांना लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. राज्य सरकारतर्फे पालिकेच्या ‘कुटुंब कल्याण व माता, बाल संगोपन विभागा’मार्फत गोळ्यांचे गरीब व गरजू महिलांना वितरण केले जाते. फरिदाबादमधील ‘नेस्टर फार्मास्युटिकल’ कंपनीने मार्च, २०१४मध्ये उत्पादित केलेल्या या लोहयुक्त गोळ्या सरकारकडून पालिकेकडे आल्या. या गोळ्यांची मुदत फेब्रुवारीत संपुष्टात येत असून, आजघडीला पालिकेकडे तब्बल ४० लाख ३० हजार गोळ्या पडून आहेत.
कुटुंब कल्याण व माता बाल संगोपनाचे काम करणाऱ्या पालिकेच्या १६८ आरोग्य केंद्रांमध्ये या ४० लाख ३० हजार गोळ्या अलीकडेच वितरित करण्यात आल्या. प्रत्येक केंद्रात २४ हजार गोळ्या देण्यात आल्या असून, त्या फेब्रुवारी, २०१६पर्यंत संपवायच्या आहेत.
गरोदर मातेला पहिले चार महिने सोडून उर्वरित काळात दिवसातून दोन, बाळंतीण महिलेला दिवसातून दोन वेळा, तीन महिन्यांपर्यंत, तसेच रक्तक्षय झालेल्या मुलींना सहा महिने ते एक वर्ष आठवडय़ातून दोन गोळ्या दिल्या जातात. केंद्रात येणाऱ्या गरोदर, बाळंतीण आणि रक्तक्षयग्रस्त मुलींसाठी सुमारे चार ते १० हजार गोळ्या पुरेशा असतात. तरीही तब्बल २४ हजार गोळ्यांचा साठा केंद्रात उपलब्ध करण्यात आला असून, त्या संपवायच्या कशा, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
गरज होती तेव्हा साठा अपुरा
मार्च, २०१४मध्ये उत्पादित झालेल्या गोळ्या जानेवारी, २०१६ मध्ये वितरित करून त्या कालबाह्य़ होण्यापूर्वी वितरित करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव येत आहे. यापूर्वी केंद्रांमध्ये लोहयुक्त गोळ्यांचा साठ अपुरा असल्याची तक्रार कर्मचारी करीत होते; परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत होते. आता अचानक गोळ्यांची मुदत संपणार हे लक्षात येताच त्या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हाती देण्यात आल्या. तसेच केंद्रांमध्ये कमी गोळ्या उपलब्ध असल्यामुळे अनेक बाळंतीण महिला व रक्तक्षयाच्या मुली त्यापासून वंचित राहिल्या असाव्यात, असा संशय व्यक्त होत आहे.
लोहयुक्त गोळ्या आणि जंतनाशक मोहिमेसाठी या गोळ्यांचा साठा पालिकेला पाठविण्यात आला होता. त्या कधी पाठविण्यात आल्या, त्यांच्या कालबाह्य़तेची मुदत काय हे तपासून पाहावे लागेल.
– पद्मजा कोसकर,
पालिका कार्यकारी वैद्यकीय अधिकारी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा