मुंबई : देशातील सर्वात लांब सागरी पूल असलेल्या अटल सेतूवरून मंगळवारी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील विद्युत शिवनेरी बस धावली. यावेळी प्रवाशांनी अटल सेतुवरून शिवनेरी बसमधून जाताना नयनरम्य दृश्याचा आनंद घेतला. मंगळवारी दिवसभरात चार शिवनेरी बसच्या फेऱ्या धावल्या. त्यातून १०७ प्रवाशांनी प्रवास केला. एसटीला ३७,३७५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर, पुणे-मुंबई-पुणे प्रवासातील ४० मिनिटांची बचत अटल सेतूमुळे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अटल सेतूचे लोकार्पण झाल्यापासून या पुलावरून जाण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी प्रवाशांची, पर्यटकांची गर्दी जमत होती. मात्र, दररोज मुंबई-पुणे प्रवास एसटीने करणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूवरून जाता येत नव्हते. त्यामुळे या प्रवाशांनी अटल सेतूवरून शिवनेरी चालवण्याची मागणी केली होती. याबाबत एसटी महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद देऊन, प्रायोगिक तत्त्वावर स्वारगेट ते दादर, दादर ते स्वारगेट, पुणे ते मंत्रालय आणि मंत्रालय ते पुणे अशा चार फेऱ्या सुरू केल्या आहेत. या बस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय किंवा दादर येथे पोहचल्या.

हेही वाचा – कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई-पुणे मार्गावर दररोज २१० शिवनेरी बस चालवल्या जात आहेत. या दोन शहरांमधील अंतर पार करण्यासाठी ४ तास २० मिनिटे लागतात. तर, अटल सेतूवरून धावणाऱ्या शिवनेरी बसने जाता-येता ३ तास ४० मिनिटांचा कालावधी घेतला. त्यामुळे प्रवाशांच्या ४० मिनिटांची बचत झाली, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने दिली.

मंगळवारी सकाळी ७ वाजता दादर ते स्वारगेट अटल सेतू मार्गावरून विद्युत शिवनेरी बस धावली. यावेळी परळ आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना पेढे आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. पहिल्याच दिवशी दादर ते स्वारगेट २४ प्रवाशांनी प्रवास केला. या बस सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. तरी भविष्यात जास्तीत जास्त बस अटल सेतू मार्गावरून चालविण्याचे नियोजन आहे, असे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

हेही वाचा – मुंबई : सोन्याच्या तस्करीप्रकरणी श्रीलंकन टोळीशी संबंधित एकाला अटक, विमानतळावरून दोन कोटी रुपयांचे सोने जप्त

अटल सेतू मार्गे

स्थळ – प्रवासी – उत्पन्न

स्वारगेट ते दादर – ३६ – ११,८४५ रुपये

दादर ते स्वारगेट – १९ – ४,९५५ रुपये

पुणे ते मंत्रालय – ३५ – १५,४७० रुपये

मंत्रालय ते पुणे – १७ – ५,१०५ रुपये

एकूण – १०७ – ३७,३७५ रुपये

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 minutes saving due to atal setu the run of shivneri in the convoy of st from atal setu mumbai print news ssb
Show comments