* चर्चगेट-डहाणूचा पत्ताच नाही
* ‘नऊ डबा’ होणार इतिहासजमा
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-डहाणू उपनगरी गाडीचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आणखी ४० नव्या फेऱ्या धावणार असून त्यात दोन महिला विशेष गाडय़ांचाही समावेश आहे. १२ आणि १५ डब्यांच्या गाडीच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून नऊ डब्याची उपनगरी गाडी आणखी काही दिवसच केवळ हार्बर मार्गावर धावताना दिसणार आहे. पश्चिम रेल्वेच्या या नव्या फेऱ्या शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील बहुचर्चित चर्चगेट-डहाणू उपनगरी गाडी २९ मार्चपासून सुरू होणार असे सांगण्यात येत होते. त्याप्रमाणे या गाडीची चाचणीही घेण्यात आली. मात्र या मार्गावरील काही चाचण्या सुरू असल्याने अद्याप या गाडीचा मुहूर्त निश्चित झालेला नसल्याचे गुरुवारी पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
महिला प्रवाशांसाठी १२ डब्यांच्या दोन महिला विशेष गाडय़ा चर्चगेट-वसई रोड दरम्यान चालविण्यात येणार आहेत. नवी महिला विशेष सकाळी ९.५६ वाजता वसई रोड येथून सुटेल तर सायंकाळी चर्चगेटहून ७.४० वाजता वसईसाठी सुटेल. यामुळे पश्चिम रेल्वेच्या महिला विशेष गाडय़ांच्या फेऱ्यांची संख्या आता आठ झाली आहे.
नव्या फेऱ्यांपैकी १९ चर्चगेटच्या दिशेने तर २१ विरारच्या दिशेने चालविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १५ डब्यांच्या १६ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून आता पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या ३० फेऱ्या झाल्या आहेत. नऊ डब्यांच्या सध्या असलेल्या १० फेऱ्या १२ डब्यांच्या गाडीत परावर्तित करण्यात आल्या असून १२ डब्यांच्या आणखी १२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. चर्चगेट-विरार दरम्यान आता एकही नऊ डब्यांची गाडी चालविण्यात येणार नसून आता केवळ हार्बर मार्गावरच या गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.
नव्या ४० फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्यांची संख्या १२९० इतकी झाली असून त्यात १५ डब्यांच्या गाडय़ांच्या फेऱ्यांची संख्या ३०, १२ डब्यांच्या गाडय़ांची संख्या ११५० तर हार्बर मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाडय़ांची संख्या ११० इतकी आहे. नव्या वाढविण्यात आलेल्या फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेची प्रवासी वहन क्षमता पावणेदोन लाखांनी वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाढविण्यात आलेल्या फेऱ्या
चर्चगेट-विरार : सहा (तीन अप, तीन डाऊन),
नालासोपारा-चर्चगेट : दोन अप, चर्चगेट-वसई रोड : दोन (एक अप महिला विशेष, एक डाऊन महिला विशेष),
चर्चगेट-भाइंदर : पाच (दोन अप, तीन डाऊन), दादर-भाइंदर : दोन (एक अप, एक डाऊन), वांद्रे-भाइंदर : एक डाऊन, बोरिवली-भाइंदर : एक डाऊन.
चर्चगेट-वांद्रे : दोन डाऊन, चर्चगेट-अंधेरी : चार (दोन अप, दोन डाऊन).
बोरिवली-विरार : आठ (सहा अप, दोन डाऊन), बोरिवली-नालासोपारा : एक डाऊन, बोरिवली-वसई रोड : एक डाऊन.
अंधेरी-भाइंदर : तीन (दोन अप, एक डाऊन), अंधेरी-विरार : दोन डाऊन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा