मुंबई : किंग्ज सर्कल येथील गौड सारस्वत ब्राह्मण म्हणजेच ‘जीएसबी’ सेवा मंडळाच्या गणेशमूर्तीला यंदा ६६.५ किलोग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३२५ किलोग्रॅम चांदी, तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा साज चढविण्यात येणार आहे. त्यामुळे ‘जीएसबी’ सेवा मंडळाने यंदा गणेशोत्सवासाठी तब्बल ४००.५८ कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. ‘द न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनी’कडून मंडळाने हा विमा उतरवला आहे. गतवर्षी मंडळाने ३६०.४० कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. यंदा मंडळाचे ७० वे वर्ष असून ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान ५ दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
‘जीएसबी’ सेवा मंडळाचे स्वयंसेवक, पुजारी, आचारी, चप्पल स्टँडवरील कामगार, सुरक्षा रक्षकांसह इतर कामगारांसाठी ३२५ कोटी रुपयांचा वैयक्तिक विमा मंडळाने उतरवला आहे. याशिवाय भूकंप आणि आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी २ कोटी रुपयांच्या विम्याची तरतूद करण्यात आली आहे. सोने, चांदी आणि दागिन्यांसाठी ४३.१५ कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. सार्वजनिक उत्तरदायित्वाच्या अनुषंगाने मंडळ, मंडप आणि भाविकांसाठी ३० कोटी रुपये आणि आगीच्या बचावापासून व इतर धोके टाळण्यासाठी ४३ लाख रुपयांच्या विम्याची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘आरटीई’ प्रवेशांसाठी मुदतवाढ… अजूनही किती जागा रिक्त?
हेही वाचा – स्पर्धा परीक्षार्थींना दिलासा… राज्य शासनाकडून ते’ परिपत्रक रद्द
पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी जीएसबी मंडळाने शाडू माती, गवत व नैसर्गिक रंगांचा वापर करून गणेशमूर्ती साकारली आहे. निसर्गाचा ऱ्हास थांबविण्यासाठी आणि कागदाचा अपव्यय टाळण्यासाठी कागदी पावत्या वगळून मंडळाने डिजिटायझेशनचा पर्याय स्वीकारला आहे. तसेच अन्नदान सेवेअंतर्गत दरदिवशी २० हजारांहून अधिक आणि पाच दिवस मिळून एक लाखांहून अधिक भाविकांना प्रसादाचे भोजन देण्यात येते, असे ‘जीएसबी’ सेवा मंडळाचे अध्यक्ष व प्रवक्ते अमित डी. पै यांनी सांगितले. सुरक्षा व्यवस्थापनाचा भाग म्हणून मंडपात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रथम दर्शनी चेहरा कैद करणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शिवाय भाविकांसाठी पूजा आणि इतर सेवांसाठी मंडळाकडून ‘क्यू ऑर कोड’ स्कॅनिंगची व डिजिटल लाईव्ह यंत्रणा सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे.
© The Indian Express (P) Ltd