अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चिंचबंदर परिसरातून ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त केले असून या तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, उत्सव काळामध्ये बाजारात भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे एफडीएच्या कारवाईतून पुन्हा एकदा उघड झाले आहे.
हेही वाचा- महाराष्ट्र ‘एटीएस’ची कारवाई ; PFI च्या पनवेल सचिवासह अन्य दोघांना अटक
एफडीएच्या दक्षता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी मंगळवार, १८ ऑक्टोबर रोजी चिंचबंदर येथील श्रीनाथजी इमारतीतील मेसर्स ऋषभ शुद्ध घी भंडारवर छापा टाकला. यावेळी अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच तुपाचा दर्जा संशय होता. त्यामुळे ४०० किलो तुपाचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त (बृहन्मुंबई), अन्न, एफडीए, शशिकांत केकरे यांनी दिली.
हेही वाचा- गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांविरोधात आरोग्य विभागाची मोहीम
जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत दोन लाख ९९ हजार ९० रुपये इतकी आहे. तुपाचे तीन नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची खरेदी नोंदणीकृत दुकानांमधून करावी, वस्तूंच्या खरेदीचे बिल घ्यावे आणि अन्नपदार्थ वा तत्सव वस्तू संशयास्पद आढळल्यास त्वरित एफडीएशी संपर्क साधावा, असे आवाहनही केकरे यांनी केले.