लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामासाठी बंद करण्यात आलेला कफ परेड येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील उत्तरेकडील ४०० मीटर लांबीचा रस्ता अखेर वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) या रस्त्याची दुरुस्ती करून नुकताच तो वाहतुकीसाठी खुला केला आहे.

एमएमआरसीने ‘मेट्रो ३’च्या कामासाठी ३३.५ किमी मार्गातील अनेक रस्ते रस्तारोधक उभे करून वाहतुकीसाठी बंद केले होते. अनेक वर्ष रस्ते बंद असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचा थेट फटका मुंबईकरांना बसत आहे. पण मागील काही महिन्यांपासून जसजसे काम पूर्ण होत आहे, तसतसे बंद करण्यात आलेले रस्ते दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुले करण्यात येत आहेत. आतापर्यंत १४.५३ किमी लांबीचे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. सीप्झमधील २,१०२ मीटर, धारावीतील १,७३० मीटर, विद्यानगरी स्थानकाजवळील १,३२५ मीटर, दादर परिसरातील १,१९६ मीटर, शितलादेवी परिसरातील १,१७० मीटर लांबीच्या रस्त्यांचा त्यात समावेश आहे. हे रस्ते मोकळे झाल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू लागला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात ‘मेट्रो ३’साठी बंद केलेले सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे.

आणखी वाचा-पुनर्वसनातील घर दिल्यानंतरच धारावी प्रकल्पात झोपडी जमीनदोस्त! पुनर्वसन प्रकल्प कंपनीचा दावा

एमएमआरसीने नुकताच कफ परेड येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील उत्तरेकडील ४०० मीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. हा रस्ता खुला झाल्याने कफ परेड परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. दरम्यान ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी पहिला टप्पा ऑगस्टमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. त्यानुसार या टप्प्याच्या रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) चाचणीला सुरुवात झाली आहे. पुढील दोन आठवडे या चाचण्या सुरू राहणार आहेत. आरडीएसओचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ऑगस्टपासून मुंबईकरांना भुयारी मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.