प्रसाद रावकर
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक डोळय़ासमोर ठेऊन माजी नगरसेवकांनी आपल्या नगरसेवकपदाच्या कारकीर्दीत प्रभागांमधील मतदारांना खुश करण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतील कोटय़वधी रुपयांची खैरात केली आहे. विशेष निधीच्या नावाखाली तब्बल ४१ कोटी रुपयांहून अधिक रकमेची उधळपट्टी करण्यात आली असून या निधीतून प्रभागांमधील नागरिकांना टॅब, शिलाई यंत्र, घरघंटी, लॅपटॉप संगणक, साडय़ा, छत्री, चष्मा, कूकर, शैक्षणिक साहित्य, अपंगांसाठी वाहन, झेरॉक्स यंत्र आदींचे वाटप करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई महापालिका सभागृहाची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तत्पूर्वीचे २०२१-२२ आर्थिक वर्ष निवडणूक वर्ष म्हणूनच डोळय़ासमोर ठेऊन नगरसेवक, तसेच निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक मंडळी कामाला लागली होती. मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्पात प्रशासनाने स्थायी समिती आणि महापौरांना विशेष निधीच्या नावाखाली तब्बल ४१ कोटी ४६ लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली होती. पालिकेची निवडणूक फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये अपेक्षित होती. त्यामुळे २०२१-२२ या वर्षांमध्ये नगरसेवकांनी प्रभागांमध्ये कामांचा धडाका लावला होता. त्यासाठी नगरसेवक निधी, प्रभाग निधीबरोबरच विशेष निधीचाही उपयोग साहित्य वाटपासाठी केला.
स्थायी समिती अध्यक्ष वा महापौरांकडून अधिकाधिक विशेष निधी मिळावा यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते. गेल्या वर्षभरात काही नगरसेवकांनी या निधीतून विद्यार्थ्यांना टॅब, लॅपटॉप, संगणक, शैक्षणिक साहित्य आदींचे वाटप केले. तर काहींनी अपंगांना विजेवर धावणारी तीनचाकी स्कुटर, झेरॉक्स यंत्रेही दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी स्मार्ट घडय़ाळ, आधार काठीचेही वाटप करण्यात आले. इतकेच नव्हे तर साडय़ा, छत्री, कापडी पिशव्या, चष्मा, कूकर, जेवणाचा डब्बा आदींचेही या निधीतून वाटप करण्यात आले. त्यापैकी बहुतांश वस्तू पालिकेच्या प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या स्तरावर नगरसेवकांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आल्याची माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
प्रभागांमधील साधारण रस्ते, पदपथ, वस्त्यांमधील पायवाटा, शौचालयांची दुरुस्ती, लादीकरण, दिवाबत्ती, गटारांची दुरुस्ती, गटारांवर झाकण बसविणे अशा प्रकारची कामे या निधीतून करण्यात येतात. त्याचा प्रभागांतील अनेक मतदारांना फायदा होतो. मात्र, गेल्या वर्षभरात आगामी निवडणुकांवर डोळा ठेऊन निधीचा वापर झाल्याचे वस्तू वाटपावरून निदर्शनास आले आहे. (पूर्वार्ध)
विशेष निधी म्हणजे काय?
नगरसेवकांना आपापल्या प्रभागांमध्ये छोटी-मोठी नागरी कामे करता यावी या उद्देशाने हा विशेष निधी देण्यात आला होता. प्रशासनाकडून मिळणाऱ्या या निधीचा काही भाग स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर पालिकेतील राजकीय पक्षांना उपलब्ध करून देतात. त्यानंतर पक्ष आपापल्या नगरसेवकांना त्याचे वाटप करतात. तसेच स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर यापैकी काही निधी थेट नगरसेवकांना उपलब्ध करतात. गेली अनेक वर्षे विशेष निधीचे वाटप अशा पद्धतीने सुरू आहे. मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्पात प्रशासनाने स्थायी समिती आणि महापौरांना विशेष निधीच्या नावाखाली तब्बल ४१ कोटी ४६ लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली होती. पालिकेची निवडणूक फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये अपेक्षित होती. त्यामुळे २०२१-२२ या वर्षांमध्ये नगरसेवकांनी प्रभागांमध्ये कामांचा धडाका लावला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा