अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन दोन दिवस लोटतात न तोच अशा स्वरूपाच्या बेकायदा बांधकामांमुळे असलेल्या धोक्याची प्रचिती गुरुवारी आली. मुंब्रा शीळफाटा परिसरातील लकी कंपाऊंड भागात नाला बुजवून अवघ्या दोन महिन्यांत उभारण्यात आलेली आठ मजली इमारत गुरुवारी सायंकाळी पूर्णपणे कोसळून ४१ ठार तर ४० हून अधिक जण जखमी झाले. पाणीपुरवठा नसताना याठिकाणी रहात असलेली २८ कुटुंबे आणि येथे सुरू असलेला कोचिंग क्लास यांमुळे इमारत कोसळली तेंव्हा अनेकजण तिच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
लकी कंपाउंड परिसरात पावसाचे पाणी वाहून नेणारा एक मोठा नाला बुजवून त्यावर या इमारतीचा पाया रचण्यात आला होता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दोन दिवसांपूर्वी इमारतीच्या गच्चीवर पाण्याची टाकी उभी करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे इमारतीच्या छताचे प्लास्टरही गळून पडत होते. याबाबत क्लासेसमधील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेले. अशातच गुरुवारी सायंकाळी मोठ्ठा आवाज करत ही इमारत पत्त्यासारखी खाली कोसळली व अनेकजण तिच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले. या घटनेत आतापर्यंत ४१ जण ठार झाल्याचे सांगण्यात आले, तर ४० हून अधिक जणांना जखमी अवस्थेत काढण्यात आले. त्यांच्यावर ठाणे सिव्हिल, कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय तसेच नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार क्रेन व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरूच होते.
दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये केली.