नवी मुंबईतील खारघर येथील हेक्झा वर्ल्ड गृहबांधणी प्रकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ४१ अभियंते-अधिकाऱ्यांना आलिशान फ्लॅट कशासाठी दिले गेले, असा सवाल करीत भाजप राष्ट्रीय चिटणीस किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, अधिकारी व कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप सोमवारी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी विशेष पथकाकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास परवानगी देत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेक्झा वर्ल्ड हा नवी मुंबईतील सर्वात मोठय़ा प्रकल्पापैकी एक प्रकल्प असून सुमारे ७० लाख चौ.फूट चटईक्षेत्र असलेल्या प्रकल्पाची किंमत सुमारे ५०० कोटी रूपयांहून अधिक आहे. त्यासाठी ब्ल्यू सर्कल इन्फ्राटेक, शिवयश डेव्हलपर्स यांसारख्या नकली कंपन्यांकडून जमीनखरेदी करण्यात आली. या कंपन्यांचे भागीदार नेनसी बिल्डर्स, अक्षय अरोरा, जेम्स डिसिल्वा आदी आहेत. डिसिल्वा यांच्या नावे असलेल्या जमिनीचे दोन डझनाहून अधिक तुकडे करून ते ब्ल्यू स्टार, शिवयश यांच्या नावे हस्तांतरित करण्यात आले. भुजबळ यांच्या देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. ला ही जमीन २०१०-११ मध्ये घोटाळेबाज पध्दतीने विकण्यात आली. या सर्व बेकायदा व्यवहारांच्या बदल्यात अभियंते-अधिकाऱ्यांना आलिशान फ्लॅटची भेट मिळाली, असा आरोप सोमय्या यांनी केला. उच्चपदस्थांचे गैरव्यवहार उघड करीत असल्यामुळे आपल्याला  धमक्या येत असल्याचे सोमय्या यांनी या वेळी सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा