सात वर्षांपूर्वी ठाणे येथील भीषण बस अपघातात जखमी झाल्यानंतर आयुष्यभराचे अपंगत्व नशिबी आलेल्या आणि त्यामुळे उपजीविकेचे सर्व मार्ग बंद झालेल्या शेख फारूख गौस (३३) या तरुणाला नुकसान भरपाई म्हणून ४१.३१ लाख रुपये देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) सेवेला दिले आहेत. सात वर्षांपूर्वी झालेल्या या अपघातात ३० प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते.
या अपघातापूर्वी शेख मीरा रोड येथे मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवत होता व त्याच्याकडे दोनजण नोकरीला होते. २००८ मध्ये मोटार अपघात लवादाने त्याला नुकसान भरपाई म्हणून १०.६१ लाख रुपये मंजूर केले. परंतु या अपघातामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले असून मोटार अपघात लवादाने नुकसान भरपाई म्हणून मंजूर केलेली रक्कम कमी असल्याचा दावा करीत शेखने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच नुकसान भरपाई म्हणून ६५ लाख रुपये देण्याची मागणी केली होती.
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्या खंडपीठाने त्याच्या याचिकेवर निकाल देताना शेखचा दावा मंजूर करीत त्याला ४१.३१ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मोटार अपघात लवादाने शेखला नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करताना अपघातापूर्वी त्याला मिळणाऱ्या मासिक मिळकतीतून त्याचा वैयक्तिक खर्च वजा करून चूक केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच अपघातानंतर शेखला आलेले कायमस्वरूपी अपंगत्व, त्यामुळे निर्माण झालेला उपजीविकेचा प्रश्न, वैद्यकीय खर्च, व्हील चेअर आणि वॉटरबेड आदींवर येणारा खर्च लक्षात घेऊन ४१.३१ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली.
शेखच्या कमरेखालच्या भागाला पूर्णपणे बधीरत्व आले असून त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टीही गेली आहे. त्यामुळे वैद्यकीय खर्च भरमसाठ आहे. या सबबीखाली तो वगळणे शेखला शक्यच नसल्याचे नमूद केले. तसेच नुकसान भरपाईच्या एकूण २५ टक्के रक्कम धनादेशाद्वारे देण्याचे आणि उर्वरित रक्कम त्याच्या नावे अनुक्रमे १० व १५ वर्षांसाठी अनामत रक्कम म्हणून जमा करण्याचे तसेच त्यावर ७.५ टक्के व्याज देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Story img Loader