मुंबई : शेजारीच राहणाऱ्या मित्राने किरकोळ वादातून चाकूने वार करून ४१ वर्षीय व्यक्तीची निर्घूण हत्या केल्याची घटना अंधेरी पूर्व येथे घडली. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला राहत्या परिसरातून अटक करण्यात आली. आरोपीने हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे. छातीवर डाव्या बाजूला चाकुमुळे गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सुजीत हरिवंश सिंह (४१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सहार रोड परिसरात ते कुटुंबियांसोबत राहत होते. त्यांची पत्नी पूनम सुजित सिंह (३९) यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी सुनील परशुराम कोकाटे (५२) याला अटक केली. तक्रारीनुसार, सुजीत व सुनील दोघेही चांगले मित्र होते. सुजीत आणि सुनील शेजारी होते. पण काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये किरकोळ कारणामुळे भांडण झाले होते. त्यामुळे संतापलेल्या सुनीलने मालाधारी रहिवासी संघ येथील यशोधन सोसायटीच्या कार्यालयासमोर सुजीतला गाठले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला.
सुनीलने चाकूने सुजीतवर वार केले. सुजीत खाली कोसळताच सुनील तेथून पळून गेला. या प्रकारानंतर तात्काळ सुजीतला कुपर रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे दाखल होण्यापूर्वीच सुजीतचा मृत्यू झाला होता. सुजीतच्या छातीत डाव्या बाजूला व उजव्या हातावर गंभीर जखमा झाल्या होत्या. छातीवर वार केल्यामुळे हृदयाला गंभीर इजा झाली. त्यामुळे सुजीतचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी सुजीतच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ पोलीस पथकाला रवाना केले. त्यांनी सहार रोड परिसरात शोध मोहीम राबवून सुनीलला अटक केली. हत्येसाठी वापरलेला चाकू सुनीलकडून हस्तगत करण्यात आला असून तो न्यायावैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. याशिवाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून याप्रकरणी काही जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.