मुंबई : गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात ४२.७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणांमध्ये ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी सहा धरणे भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबईत आणि महानगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असला तरी तुलनेत धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. दररोज थोडोथोडा पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात केवळ निम्मा पाणीसाठा जमा झाला आहे.
हेही वाचा >>> विकासकांना रेरा कायद्याचा धाक नाही? कारवाईनंतरही रेरा क्रमांकांशिवाय जाहिरात प्रसिद्ध करण्याचे प्रकार सुरूच
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतील पाणीसाठ्यात दररोज वाढ होते आहे. पावसाबरोबरच जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे पाणीसाठा वाढत आहे. मात्र अजूनही गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमीच आहे.
उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईकरांना दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सध्या धरणांमध्ये ६ लाख १८ हजार ७५४ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.
दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा
२१ जुलै २०२३……६ लाख १८ हजार ७५४ दशलक्ष लिटर……४२.७५ टक्के
२१ जुलै २०२२……१२ लाख ८२ हजार २६६ दशलक्ष लिटर……८८.५९ टक्के
२१ जुलै २०२१……५ लाख ३१ हजार ७३३ दशलक्ष लिटर……. ३६.७४ टक्के