मुंबई: भांडवली खर्चासाठी येत्या अर्थसंकल्पात तब्बल ४३ हजार कोटींपेक्षा अधिकची तरतूद केली आहे. कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पांची घोषणा अर्थसंकल्पात केलेली नसली तरी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूदी करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महापालिकेच्या ७४ हजार कोटींच्या अर्थसंकल्पात महसूली खर्चावर नियंत्रण ठेवत पालिका प्रशासनाने भांडवली खर्चासाठी मोठी तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ५८ टक्के खर्च हा भांडवली कामांसाठी केला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात भांडवली कामांसाठी ३७,३३२ कोटींची तरतूद केली होती. यंदा त्यात सहा हजार कोटींची वाढ झाली आहे.

भांडवली कामांमध्ये रस्ते, पूल, सागरी किनारा, पर्जन्य जलवाहिन्या, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता अशा विविध कामांसाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी वर्सोवा दहिसर, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प या तीन मुख्य प्रकल्पांसाठी निधीची विशेष तरतूद करण्यात आली असून या प्रकल्पांना येत्या आर्थिक वर्षात निधी कमी पडणार नाही याची विशेष काळजी घेतली असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

महसूली खर्चावर नियंत्रण

महसूली खर्च कमी करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला असून खर्चाचे सुसूत्रीकरण करण्याकरीता धोरण ठरवण्यात आले आहे. आर्थिक वर्षातील महसुली खर्च उपलब्ध तरतूदीच्या मर्यादेतच ठेवण्याबाबत अर्थसंकल्पातूनच ताकीद देण्यात आली आहे. तसेच उपलब्ध मनुष्यबळाचा पूर्ण वापर करून आस्थापना खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.