मुंबई : गोरेगाव येथील बारमध्ये एका खोलीत ४३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला असून वनराई पोलिसांनी देवराज गौडा(४४) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती, रघू उर्फ अरुण गौडा हा मालाड पश्चिमेतील एका बारमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. आरोपी गौडा काम करत असलेल्या बारमध्ये झालेल्या वादाला रुघू जबाबदार असल्याचा संशय होता. त्यामुळे ही हत्या करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार देवराज हा मालाड येथील बारमध्ये वारंवार यायचा. २५ फेब्रुवारीच्या पहाटे, त्या बारमध्ये एका ग्राहकाशी देवराजचे भांडण झाले. त्यानंतरच्या झटापटीत देवराजला मारहाण झाली. देवराजला वाटत होते की या घटनेसाठी रघू जबाबदार आहे. पण त्यावेळी तो बारमध्ये उपस्थित नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच रघू त्याच्या विरोधात बारमालकाला भडकवत असल्याचाही देवराजला संशय होता. त्याच सकाळी, देवराज गोरेगाव पूर्वेतील धडकन बारमध्ये गेला. बार एका वर्षापासून बंद असल्यामुळे रघू आणि काही बार कर्मचारी झोपले होते. बारचा दरवाजा बंद होता पण माजी कर्मचारी असल्यामुळे देवराजला आत जाण्याचा मार्ग माहित होता. त्याने इमारतीची भिंत चढून प्रवेश केला आणि लोखंडी सळीने रघूच्या डोक्यात वार करून पळून गेला.
जवळच झोपलेल्या एका बार कर्मचाऱ्याने रघुच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. त्याने जाऊन पाहिले असता रघू रक्तबंबाळ अवस्थेत जखमी पडला होता. त्याने तातडीने पोलिसांना कळवले आणि रघुला ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण २६ फेब्रुवारी रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. वनराई पोलिसांनी हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी देवराज तेथे आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याचाच हत्येत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी विशेष पथक स्थापन करून मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहिम राबवली. देवराज महिमच्या समुद्रकिनारी झोपलेला आढळला. त्याला गुरूवारी ताब्यात घेऊन वनराई पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली.
आरोपी दुचाकी घेऊन घटनास्थळी आला होता. त्यावेळी देवराज व इतर कर्मचारी बारमधील मेकअप रुममध्ये झोपले होते. याप्रकरणी महेंद्र सेन याच्या जबाबावरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.