मुंबई: अंधेरी पश्चिममध्ये जेव्हीएलआर परिसरात पालिकेच्या के पश्चिम विभागाने मोठी कारवाई करून मेट्रो लाईन ६ च्या आड येणारी ४५ बांधकामे हटवली आहेत. त्यामुळे मेट्रो मार्गाला लागून असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर एस व्ही रोड ते लोखंडवालापर्यंतचा प्रवास सुलभ होणार आहे.
स्वामी समर्थ नगर ते विक्रोळीपर्यंत असलेल्या मेट्रो लाईन ६ च्याबाजूने असलेली ४५ बाधित बांधकामे तोडण्यात आली आहेत. पालिकेच्या के पश्चिम विभागाने ओशिवरा पोलीसांच्या मदतीने सोमवारी ही कारवाई पार पाडली. या मार्गावरील विकास आराखड्यातील रस्त्याचा प्रकल्प २०१९ पासून रखडला होता. मात्र आता ही बांधकामे तोडल्यामुळे रस्त्याच्या कामाला वेग येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी दिली. या कारवाईसाठी ५० पोलिस कर्मचारी, पालिकेचे २५ कामगार, २ जेसीबी, १ पोकलेनचा वापर करण्यात आला.
हेही वाचा >>>VIDEO : सिनेट निवडणुकीवरून मनसेचा मुंबई विद्यापीठात राडा, कुलगुरूंना घेराव; म्हणाले, “व्यवस्थेचे विदूषकी चाळे…”
रस्ता रुंदीकरणाचा हा प्रकल्प २०१९पासून प्रलंबित होता. २०१९ मध्ये बीएमसीने परिशिष्ट जारी केले होते आणि अनेक प्राधिकरणांसह न्यायालयीन प्रकरणांमुळे निष्कासन लांबणीवर पडला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मेट्रो मार्ग ६ चेही काम रखडले होते. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असते. तसेच पर्जन्यजलवाहिन्यांचे जाळेही वाढवता येत नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबत होते. तसेच एरव्हीही रस्त्यावर गटाराचे पाणी येत होते. मात्र बांधकामे हटवल्यामुळे ही सर्व कामे मार्गी लागणार आहेत.
दरम्यान, हा रस्ता लवकरच एमएमआरडीएतर्फे बांधला जाणार आहे. त्याकरीता पालिकेने प्राधिकरणाला निधी दिला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इन्फिनिटी मॉल ते वीरा देसाई हा ३६.६० मीटर रुंदीचा डीपी रस्ता रस्ता रुंदीकरणासाठी घेण्यात आला आहे. एकदा हा मार्ग पूर्ण झाल्यावर एसव्ही रोड ते लोखंडवाला आणि जवळपासच्या भागात पूर्व पश्चिम प्रवासासाठी मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.