मुंबई : एकीकडे अनेक देश उपासमार, युद्धामुळे निर्माण झालेला अन्न तुटवडा, नैसर्गिक कारणांमुळे आलेला दुष्काळ तसेच कुपोषणाशी झगडत असताना अर्धे जग मात्र लठ्ठ होण्याच्या मार्गावर आहे. २००५ पर्यंत जगातील एकतृतियांश लोक लठ्ठ झालेले असतील. लॅन्सेट या आरोग्य शोधपत्रिकेनं जाहीर केलेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. या अहवालात जगभरातील २०० देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात भारतीयांसाठी विशेष धोका व्यक्त करण्यात आला असून भारतात आगामी २५ वर्षांत लठ्ठ लोकांची संख्या ४५ कोटींवर जाईल. म्हणजेच साधारणतः एकूण लोकसंख्येच्या एक तृतियांश लोकसंख्या लठ्ठ असेल असे नमूद केले आहे.
प्रत्येक तीन माणसातला एक माणूस लठ्ठ झाल्यावर साहजिकच लठ्ठपणा, त्याच्याबरोबर येणारे इतर आजारही वाढीस लागतील आणि त्या सर्वाचा ताण भारताच्या साधनसंपत्ती, अन्नपुरवठा, औषधं, आरोग्य सेवेवर होईल, असेही लॅन्सेटमध्ये म्हटले आहे. या अहवालात तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी उत्पन्न असणाऱ्या लोकसंख्येच्या देशात या दशकभरात लठ्ठपणा वेगानं वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
लॅन्सेटने लठ्ठपणाविषयी काही स्पष्ट निरीक्षणे नोंदवली आहेत. अतिवजन वाढण्याच्या आणि लठ्ठपणा वाढण्याच्या गतीला संथ करण्यामध्ये कोणत्याही देशाला यश आलेले नाही असे या अहवालात म्हटलं आहे. यावर वेळीच परिणामकारक उपाय केले नाहीत तर जगभरात वजनवाढ आणि लठ्ठपणा असाच वाढत जाईल असे म्हटले आहे. याबाबतीत या अभ्यासात अफ्रिका आणि आशियाकडे विशेष लक्ष वेधले आहे. या दोन खंडात लठ्ठपणा वेगाने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांचे ‘वजन’ या देशांवर पडणार असल्याचे हा अभ्यास म्हणतो. लठ्ठपणा विरोधात आक्रमक उपाय योजून काम केल नाही तर जगभरात लठ्ठपणामुळे होणारे आजार आणि मृत्यूंची संख्या वाढणार, अशी धोक्याची घंटाही यात वाजवली आहे.
जगात १०९० ते २०२१ या काळात सर्वच प्रदेशात लठ्ठपणाचा वेग वाढला आहे. २०२१ पर्यंतच्या माहितीनुसार जगातले एक अब्ज पुरुष व एक अब्ज ११ लाख महिला लठ्ठ होत्या. या लठ्ठ लोकसंख्येत चीनमधील लोकं सर्वाधिक आहेत. सुमारे ४० कोटी चिनी लोकं लठ्ठ असल्याचे दिसून येते. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतातील १८ कोटी लोकं तर अमेरिकेतले १७ कोटी दोन लाख लोक लठ्ठंभारती बनले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आशियातील देश, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढत असून यातील अनेक देशांमध्ये लोकसंख्येच्या ८० टक्के लोक हे ज्येष्ठ नागरिक आहेत.
भारतात आगामी २५ वर्षांत एक तृतियांश लोक लठ्ठ होतील असे लॅन्सेटच्या अहवालात म्हटले आहे. लठ्ठपणा आजवरचा इतिहास पाहता आणि लठ्ठपणा वाढत जाण्याचा हा वेग पाहाता २०५० साली जगातील तीन कोटी ८० अब्ज प्रौढ लोक लठ्ठ असतील. यातही चीन, भारत व अमेरिका आघाडीवर असतील. हा लठ्ठपणा ठरवण्यासाठी लॅन्सेटच्या अभ्यासकांनी ‘बीएमआय’ हे प्रमाण एकक मानले आहे. बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. अर्थात बीएमआयला मर्यादा आहेत हे लॅन्सेटच्या संशोधकांनी मान्य केलं आहे. तरीही बीएमआयमुळे बहुतांश आरोग्य व आजाराविषयी अंदाज येतो. २५ पेक्षा जास्त बीएमआय असेल तर अतिवजन व ३० च्या वर बीएमआय गेला तर ‘ओबेसिटी‘ असं मानले जाते.
आजवरचे कल पाहाता आगामी २५ वर्षांत लठ्ठपणा वेगाने वाढलेला दिसेल, असे लॅन्सटमध्ये म्हटले आहे. लठ्ठ व अतिवजन असलेल्या लोकांची संख्या तीन कोटी आठ अब्जवर जाईल. चीनमधील सुमारे ६२ कोटी सात लाख लोक तर भारतातील सुमारे ४५ कोटी लोक लठ्ठ असतील. अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असून तेथे २१ कोटी लोकं लठ्ठ होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लठ्ठपणाला किंवा वजनवाढीला असंसर्गजन्य आजारांची जननी म्हटले जाते. परिणामी हृदयरोग, रक्तदाब वाढणे व मधुमेहाच्या आजारांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.
भारतातील आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार या लठ्ठपणावर मात करण्यासाठी सकस अन्नाचा पुरवठा सरकारने करणे गरजेचे आहे. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी व जीवशैली निश्चित करण्याची गरज आहे. ताण-तणावापासून मुक्त जीवन जगण्यासाठी योग्य प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रामुख्याने लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांना ‘जंक फुड्‘पासून दूर ठेवण्याची गरज आहे. एकीकडे दर पाच मुलांमध्ये दोन मुलांना अतिवजन किंवा लठ्ठपणाचा त्रास होतोय तर दुसरीकडे भारतात कुपोषणाचाही प्रभाव अजून आहे.
शाळांच्या उपहारगृहात, शाळेकडून मिळणारे जेवण, डब्यातले अन्न यात कमी कर्बोदकं, कमी साखर आणि कमी प्रक्रिया केलेले अन्न असावे. शालेय अभ्यासक्रमात आहारविषय तसेच योग्य जीवनशैलीविषयी धडे असले पाहिजे असेही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. लॅन्सेटच्या अहवालाचा विचार करता शासकीय पातळीवरही व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.