मुंबईः पवई येथे चाकूने केलेल्या हल्ल्यात ४५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. याशिवाय ट्रॉम्बे येथे एका तरूणावर तिघांनी चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली आहे. या हल्ल्यात आणखी एक तरूण जखमी झाला आहे. किशोर भगवान गायकवाड(४५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याचे समजते. गायकवाड यांच्या छातीवर व गळ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. त्यामुळे गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >>> Jaipur Express Firing : हल्लेखोर आरपीएफ जवान वकिलांना म्हणाला, “मी निर्दोष आहे, मी गोळीबार…”
याप्रकरणी संदीप ऊर्फ छोट्या गुलाल बिरारे(२२) याच्याविरोधात पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता असून तो मृत किशोर गायकवाड यांच्या घरातच रहायचा. गायकवाड त्यांचे परिचीत लिन चावको वॉल्टर(२६) व शाहरुख खान यांच्यासोबत सोमवारी पवारवाडी येथील विसर्जन घाट येथे बोलत उभे होते. त्याचवेळी आरोपी संदीप तेथे आला. त्याच्याकडे चाकू होता. आरोपीने मेरे बहन के मॅटर मे तू क्यू आया था असे बोलून त्याचे चाकूने गायकवाड यांच्या छाती व गळ्यावर वार केले.
हेही वाचा >>> जयपूर – मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबारात ठार झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मदत जाहीर
गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांना रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तात्काळ संदीपला अटक केली. याशिवाय ट्रॉम्बे येथे तीन तरूणांनी केलेल्या हल्ल्यात मलिक नावाच्या २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अरमान नावाचा त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींची ओळख पटली आहे.