पोलीस दलातील उपक्रमामुळे ४६ कर्मचाऱ्यांच्या वजनात चार किलोंपेक्षा अधिक घट

मुंबई : कामाच्या अनियमित वेळा, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे मुंबई पोलीस दलातील अनेक कर्मचारी लठ्ठ झाल्याचे पाहायला मिळते. यावरून होणारी टीकाटिप्पणी आणि पोलिसांच्या मनोबलावर होणारा परिणाम यांचा विचार करून मुंबई पोलिसांनी हाती घेतलेल्या ‘स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस’ या उपक्रमाची फळे आता दिसू लागली आहेत. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षित करण्यात आलेल्या पहिल्या तुकडीतील ४६हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी महिनाभरात चार किलोहून अधिक वजन घटवले आहे.

पोलीस दलाला शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त बनवण्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाच्या पहिल्या तुकडीची सांगता बुधवारी नायगाव पोलीस मुख्यालयात झाली. यावेळी सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. जयकुमार, पोलीस उपायुक्त नियती ठक्कर यांच्यासह माजी हॉकीपटू धनराज पिल्ले आणि आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर हे उपस्थित होते.

मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांच्या प्रेरणेने १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या उपक्रमात शहरातील १४५ पोलीस सहभागी झाले

होते. वजन आणि उंचीनुसार बीएमआय (बॉडी मास्क इंडेक्स) ३० हूनअधिक असलेल्या पोलीसांची यासाठी निवड झाली. पोलीसांना १ फेब्रुवारीपासून दिवसभर तज्ज्ञ मंडळींकडून प्रशिक्षण  दिले गेले. ‘सुरुवातील हे सर्वच जण आपल्याला वजन घटवणे जमेल का म्हणून चिंताग्रस्त होते. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम आम्हाला करावे लागले,’ अशी माहिती पोलिसांना प्रशिक्षण देणारे केतन गावंडे यांनी दिली. या पोलिसांना एक मेपर्यंत सरासरी १५ किलो वजन कमी करण्याचा निर्धार करण्याचे सांगण्यात आले.  या प्रशिक्षणाचा परिपाक म्हणून महिनाभरात तुकडीतील एक तृतीयांश कर्मचाऱ्यांचे वजन चार किलोपेक्षाही कमी झाल्याची माहिती उपायुक्त नियती ठक्कर यांनी दिली. काही कर्मचाऱ्यांनी आठ ते नऊ किलोपर्यंत वजन कमी झाले आहे. पहिल्या तुकडीनंतर आता पुढील आठवडाभरातच दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

शिबिरात लावलेली शिस्त दैनंदिन व्यस्त जीवनामध्येही पाळणे कसे शक्य आहे, हेही इथे शिकविले गेले. त्यामुळे मनाशी ठरविले असल्याने महिनाभरात सहा किलो वजन कमी करून ते ९२ किलोपर्यंत आणले. कामावर रूजू झाल्यानंतरही असेच नियंत्रण ठेवणार.

– मंगेश शिंदे, पोलीस शिपाई

गेल्या महिनाभरात १३ किलो वजन कमी केले आहे. १०७ किलोवरून मी माझे वजन ९४ किलो पर्यत घटवण्यासाठी या शिबिरातून चालना मिळाली.

– सागर मोरे, पोलीस शिपाई

एकूण १४५ पोलीस कर्मचारी सहभागी

* ४ किलोहून अधिक वजनात घट – ४६ कर्मचारी

* ३ किलो वजनात घट – २७ कर्मचारी

* २ किलो वजनात घट – ४९

* १ किलो किंवा दोन किलोच्या आत वजनात घट – १८