धूलिवंदनाला रंग खेळताना जखमी झालेल्या ४६ जणांना पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यातील तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून इतरांना उपचारांनंतर सोडून देण्यात आले. उपचार सुरू असलेल्यांपैकी दोघांना अस्थिरुग्ण कक्षात दाखल केले असून तिसऱ्या रुग्णावर शस्त्रक्रिया विभागात उपचार सुरू आहेत.
रंग खेळताना डोळ्यात रंग गेल्याने, हाडांना मार बसल्याने तसेच जखमा झाल्याने महानगरपालिकेच्या केईएम, नायर व शीव रुग्णालयात गुरुवारी ४६ जणांवर उपचार करण्यात आले. केईएममध्ये २२, नायरमध्ये ११ तर शीव रुग्णालयात १३ जण उपचारांसाठी आले. केईएममध्ये चौघांना तर नायर व शीवमध्ये प्रत्येकी एकाला दाखल करून घ्यावे लागले, अशी माहिती पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. केईएममध्ये दाखल असलेल्या चौघांपैकी दोघांवर शस्त्रक्रिया विभागात तर इतरांवर अस्थिव्यंग व मेडिसिन विभागात उपचार केले जात आहेत. नायर रुग्णालयात एका रुग्णांवर शस्त्रक्रिया विभागात तर शीव रुग्णालयातील दाखल रुग्णावर अस्थिव्यंग विभागात उपचार सुरू आहेत. यापैकी कोणीही गंभीर जखमी नाही.
केईएम – २२ जखमी, चार रुग्णालयात दाखल
नायर – ११ जखमी, १ दाखल
शीव – १३ जखमी, १ दाखल