मुंबई : प्रादेशिक हवामान विभागाची २०२० ते २०२४ या कालावधीत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यातील अचूकता ४६ टक्के असल्याचे माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीतून उघड झाले आहे. अनेकदा हवामान विभागाने दिलेले मुंबईसाठीचे अंदाज फोल ठरले आहेत, तर अनेकदा ते वेळेवर जाहीर करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पर्यावरणप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्ते झोरु बथेना यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रादेशिक हवामान विभागाचे मुंबईतील पावसाचे अंदाज काय होते, त्यासाठी हवामान विभाग काय करते याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत वर्तविलेले ४१ टक्के अंदाज चुकले आहेत. तर काहीवेळा वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर, ४ टक्के अंदाज हे तीव्र स्वरुपाचे असूनही हवामान विभागाने ते जाहीर केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबईत अनेकदा कोणताही अंदाज र्वतवलेला नसताना अतिवृष्टी झाली आहे.
अंदाजांअभावी मुंबईकरांची त्रेधा
गेल्यावर्षी अतिवृष्टीचा इशारा उशिरा दिल्याने मुंबईकरांची प्रचंड धावपळ झाली होती. पावसाचा जोर वाढण्याचा इशारा केवळ अर्धा तास अगोदर देण्यात आला होता. यावेळी अवघ्या तीन तासांत अचानक मुसळधार पाऊस कोसळला होता. जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज देऊनही राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसले. इशारा दिलेल्या भागात ऊन असेही चित्र काही ठिकाणी होते. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजाबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात.
दरम्यान, मुंबई, चेन्नईसारख्या किनारपट्टीवरील मोठ्या शहरांबाबतचे इशारे चुकीचे ठरु नयेत, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज चुकू नये, यासाठी अधिक काळजी घेतली जात असल्याचे हवामान विभगाने स्पष्ट केले. त्याचबरोबर हवामान हे गतिमान असते. सकाळी जी स्थिती असते त्यावर दिवसाचा किंवा पुढील दोन तीन दिवसांचे पूर्वानुमान देण्यात येते. मात्र, पुन्हा हवामान बदलानुसार मॉड्यूल चालत राहतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी केले पूर्वानुमान तेच राहील असे नसते. अनेकदा वाऱ्यांची दिशा बदलते किंवा इतर हवामान बदल होतात. त्यानुसार हवामान विभाग माहिती अद्ययावत करतो असेही सांगितले.
अनेकदा काही तासांतच १०० मिमी पावसाची नोंद होते असं का?
जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा एक हवामान प्रणाली तयार झालेली असते. जसे की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे तसेच पूर्व पश्चिम आस तयार झाला व त्याच्या वरच्या पातळीत पश्चिमेकडून पूर्वेकडे उंचावरील एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांची स्थिती निर्माण होते याचाच परिणाम म्हणून अनेकदा मुंबईत सातत्याने पाऊस पडतो. पावसाचा जोरर्धिक असल्यामुळे काही तासांतच १०० मिमी पावसाचीही नोंद होते.