राज्यामध्ये ‘एच ३ एन २’चे रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात शुक्रवारी ‘एच ३ एन २’चे ४७ नवे रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १६६ झाली आहे. त्यामुळे राज्यामध्ये इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या ५६७ इतकी झाली आहे.राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून ‘एच ३ एन २’च्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात गुरुवार, १६ मार्चपर्यंत ‘एच ३ एन २’चे ४७ नवे रुग्ण सापडले असून राज्यातील ‘एच ३ एन २’ रुग्णांची संख्या १६६ वर पोहोचली आहे. तसेच ‘एच १ एन १’चे ७७ नवे रुग्ण सापडले असून, रुग्णांची संख्या ४०१ इतकी झाली आहे. इन्फ्ल्यूएंझाच्या ‘एच १ एन १’ आणि ‘एच ३ एन २’ या दोन्ही प्रकाराचे एकूण रुग्ण ५६७ इतकी झाली आहे. यातील १४९ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात ‘एच १ एन १’ने तीन जणांचा मृत्यू झाला असून, ‘एच ३ एन २’ने एक संशयित मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये आतापर्यंत इन्फ्ल्यूएंझाचे ३ लाख २ हजार ३७२ संशयित रुग्ण सापडले असून, त्यातील १६३५ संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर देण्यात आली आहे.
हेही वाचा >>>शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात समिती गठीत, आंदोलन मागे घ्यावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
इन्फ्ल्यूएंझाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना आरोग्य विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मृत्यू अवलोकन करण्याच्या सूचनाही राज्यस्तरावरून देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू प्रतिबंधासाठी आयईसीचे प्रोटोटाईप देण्यात आले आहे.
हे करावे
साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुवा.
पौष्टिक आहार घ्या.
लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा.
धुम्रपान टाळा.
पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
भरपूर पाणी प्या.
हे करू नका
हस्तांदोलन
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका.
आपल्याला इन्फ्ल्यूएंझा सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
वृध्द व दुर्धर आजारी लोकांनी गर्दीत जाणे टाळावे.