बनावट कागपदपत्रांच्या आधारे ‘महारेरा’कडे नोंदणी करणाऱ्या, तसेच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ६३ विकासकांपैकी ४९ विकासकांना अखेर ‘महारेरा’ने दणका दिला आहे. हे विकासक आणि त्यांच्या प्रकल्पाची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे. तर उर्वरित विकासकांची सुनावणी सुरू असून लवकरच त्यांच्याविरोधातही पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>अंधेरी गोखले पूल : पर्यायी रस्त्यांवरील फेरीवाले हटवण्याची मोहीम
कल्याण-डोंबिवली शहरातील विकासकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘महारेरा’कडे नोंदणी केल्याचे निदर्शनास आले. यासंबंधी चौकशी करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने ६५ विकासकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी ४० विकासकांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच आतापर्यंत पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, सरकार आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या या विकासकांविरोधात ‘महारेराने’ही कारवाईचा बडगा उगारला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गुन्हा दाखल केलेल्या ६५ पैकी ६३ विकासकांची यादी ‘महारेरा’ला सादर केली होती. महारेराने ऑक्टोबरमध्ये या विकासकांच्या कागदपत्रांची छाननी करून दोषी विकासकांची नोंदणी तात्काळ निलंबित केली होती. तसेच या ६३ जणांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती.नोटीस बजावण्यात आलेल्या ४९ विकासकांची सुनावणी पूर्ण झाली असून हे विकासक दोषी आढळले आहेत. त्यामुळे या विकासकांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती ‘महारेरा’तील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. उर्वरित १४ विकासकांची सुनावणी सुरू असून लवकरच त्यांच्याविरोधातही पुढील कारवाई करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.