लंडन येथे निधन झालेल्या एका एनआरआय महिलेच्या चंदिगढ येथील बँक खात्यातून ४९ लाख रुपये परस्पर हडप करण्याचा प्रयत्न माटुंगा पोलिसांनी हाणून पाडला असून या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह दोघांना अटक करत माटुंगा पोलिसांनी २७ लाख रुपये हस्तगत केले आहेत.
आयसीआयसीआयच्या चंदिगढ येथील शाखेत खाते असलेल्या गोविंद कौर या लंडन येथे वास्तव्याला होत्या. चंदिगढ येथील त्यांच्या बँक खात्यात ५६ लाख रुपये जमा होते. मात्र या खात्यातून कोणताही व्यवहार होत नव्हता. गेल्या महिन्यात ४ तारखेला कौर यांचे लंडन येथेच निधन झाले. मात्र त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कौर यांच्या आयसीआयसीआयमधील खात्यातून दादर येथील धनलक्ष्मी बँकेतील एका खात्यात सातत्याने पैसे जमा होत होते. हा व्यवहार संशयास्पद वाटल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर माटुंगा पोलिसांनी तपास करून हा घोटाळा उघडकीस आला.
आयसीआयसीआयच्या दादर शाखेतील अधिकारी महेंद्र गुरव याने आपल्या अधिकारांचा गैरवापर करत कौर यांच्या खात्याची धनादेश पुस्तिका मिळवली. तसेच कौर यांची बनावट स्वाक्षरी करून त्याने पाच धनादेशांच्या आधारे कौर यांच्या खात्यातून ४९ लाख रुपयांची रक्कम धनलक्ष्मी बँकेतील संदीप काळे व महेंद्र शिरोडकर यांच्या नावे जमा केली होती. मात्र काळे यांच्या नावाचे बोगस खाते उघडून ही रक्कम काढणाऱ्या बाळू गटे व राजेश जामकर या दोघांनाही माटुंगा पोलिसांनी अटक केली.
धनलक्ष्मी बँकेतून काढली जाणारी ही रक्कम एटीएम आणि रोख अशी काढली जात होती. या दोन खात्यांपैकी एका खात्यातून रक्कम काढण्यासाठी आलेल्या गटे आणि जामकर यांना पोलिसांनी पकडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा